सिंधुदुर्गात पुन्हा अतीवृष्टीमुळे जनजीवनावर परिणाम
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात ६ जुलै या दिवशी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे २ दिवस म्हणजे ८ जुलैपर्यंत सर्वत्र जलमय स्थिती झाली होती. त्यानंतर अधूनमधून पाऊस पडतच आहे; जिल्ह्यात १४ जुलै या दिवशी पुन्हा एकदा वादळी वार्यासह पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. समुद्रालाही उधाण आले असून किनारपट्टीवर धोक्याची चेतावणी देणारा ३ क्रमांकाचा झेंडा (बावटा) लावण्यात आला आहे. हवामान खात्याकडून १८ जुलैपर्यंत अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जनतेने सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालवण तालुक्यात मुसळधार पावसासह वार्याचा जोरही वाढला आहे. समुद्र, तसेच खाडीपात्र यांमध्ये मासेमारीसाठी कुणीही जाऊ नये, असे आवाहन बंदर विभागाने केले आहे. तालुक्यातील मसुरे पंचक्रोशीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडनदी दुथडी भरून वहात आहे. नदीकिनारी असलेल्या भातशेतीमध्ये पुन्हा एकदा पुराचे पाणी गेल्यामुळे लावणीची कामे खोळंबली आहेत. वीजपुरवठा आणि भ्रमणभाष यांची सेवाही विस्कळीत झाली आहे. गडनदी पात्रावरील गोठणे आणि किर्लोस या २ गावांना जोडणारा बंधारा आणि बांदिवडे अन् भगवंतगड यांना जोडणारा लहान पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मालवण शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले आहे. तालुक्यात बागायत आणि चिंदर येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
देवगड तालुक्यातील तळवडे येथील प्रसिद्ध न्हावणकोंड या धबधब्याकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूची दरड रस्त्यावर कोसळल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता; मात्र नंतर दरड हटवून वाहतूक चालू करण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यात साटेली-भेडशी येथील पुलाच्या जोडरस्त्यावर गतवेळी पाणी आले होते; मात्र त्याविषयीचे सूचनाफलक न लावल्याने १ चारचाकी वाहून गेली होती. त्या वेळी चारचाकीतील प्रवाशांना स्थानिक युवकांनी वाचवले होते. अशी घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने १४ जुलैला पुन्हा पाणी वाढल्यावर येथे सूचनाफलक लावले आणि वाट बंद केली.
तालुक्यातील परमे गावात पडलेल्या पावसामुळे गावातील लहान पूल (कॉजवे) पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
वेंगुर्ला तालुक्यातील तळवडे गावातील पुलावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यात अन्यत्रही मुसळधार पाऊस पडला.
कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. कुडाळ शहरातील भंगसाळ नदीला पूर आल्याने कुडाळ पंचायत समिती कार्यालयाच्या जवळील रस्ता, तसेच कुडाळ शहर ते रेल्वेस्थानक रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.
तेरेखोल नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
तिलारी नदीच्या काठी सलेल्या गावांना सतर्कतेची चेतावणी
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी या अंतरराज्य धरण प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाऊस पडत राहिल्यास धरणाच्या वरून पाणी वहाण्यास प्रारंभ होऊन तिलारी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २ मध्यम धरणे आणि १३ लहान धरणे यांतून पाणी सॊडणे चालू आहे.