भोगवे (किल्ले निवती, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील मासेमारांना सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण
सिंधुदुर्ग – मासेमारी हा व्यवसाय पुष्कळ जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करतांना मासेमारांना समुद्रात विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदयविकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे इत्यादी आपत्तींमध्ये प्राथमिक उपचार काय करावेत ? याविषयीची शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य धोक्यामुळे होणारी हानी टाळता येते अथवा त्याचा परिणाम अल्प करता येतो. या अनुषंगाने मासेमारांना सागरी सुरक्षेविषयीची माहिती व्हावी, यासाठी तालुक्यातील भोगवे (किल्ले निवती) येथील मासेमारांना ‘रिलायन्स फाऊंडेशन’ आणि ‘नागरी संरक्षण दल सिंधुदुर्ग, महाराष्ट्र शासन’ यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले.
या वेळी नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग कार्यालयाचे साहाय्यक उपनियंत्रक राजेंद्र लाड, ‘रिलायन्स फाऊंडेशन’चे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, गणपत गावडे आदी उपस्थित होते. या वेळी समुद्रामध्ये मासेमारांना हृदयविकाराचा झटका आल्यास आणि पाण्यात बुडाल्यास, विजेचा धक्का लागल्यास, साप चावल्यास हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती मासेमारांना प्रात्यक्षिकांसह समजावून सांगण्यात आल्या. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यावा ? याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. मासेमार महिलांनी ‘गॅस सिलेंडर’ची गळती झाल्यास काय करावे ? तसेच विजेचा धक्का लागल्यास काय काळजी घ्यावी ? याची माहिती राजेंद्र लाड यांनी दिली.