मागील दीड वर्षात महाराष्ट्रात ६७ वाघांचा मृत्यू !
मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत महाराष्ट्रात ६७ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये विजेच्या तारेच्या धक्क्यामुळे १० वाघांचा मृत्यू झाला आहे. मागील काही वर्षांत विजेच्या प्रवाहामुळे मृत्यू होणार्या वाघांची संख्या वाढत आहे. वर्ष २०१८ ते २०२४ या कालावधीत वीजप्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.
वर्ष २०२३ मध्ये राज्यात एकूण ५१ वाघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये नैसर्गिकरित्या २६, अपघाताने १०, विषबाधाने २, विद्युत् प्रवाहामुळे ९ वाघांचा मृत्यू झाला, तर ४ वाघांची शिकार करण्यात आली. जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत राज्यात १६ वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांचा अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी वनविभागाकडून जंगलात आवश्यक त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी संरक्षण कुटी आणि निरीक्षण मनोरे उभारण्यात येणार आहेत. वाघाची शिकार रोखण्यासाठी वनविभागाकडून जंगल भागात खबर्यांची नियुक्ती केली आहे.