‘अग्नीपथ’ : विशाल दृष्टीकोन ठेवून चालू केलेली परिवर्तनकारी योजना !

१ जुलै २०२४ या दिवशी लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने सैन्यासाठी चालू केलेल्या ‘अग्नीपथ’ योजनेविषयी टीका केली. ही योजना नेमकी काय आहे ? या योजनेवर होणारी टीका आणि त्याविषयीचे खंडण, तसेच या योजनेविषयी तरुणांनी दिलेले अभिप्राय यांविषयी मेजर जनरल (श्री.) म्रिणाल सुमन (निवृत्त) आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी केलेले सखोल केलेले विवेचन येथे आहोत.

कित्येक वर्षे सैन्यात भरती करण्याविषयीच्या योजनेमध्ये पालट करून जून २०२२ मध्ये केंद्र सरकारने ‘अग्नीपथ’ योजना लागू केली. ही योजना भूदलातील सैनिक, नौदलातील खलाशी आणि वायूदलातील एअरमन यांची भरती करण्यासाठी लागू करण्यात आली. या योजनेनुसार जे कुणी भरती केले गेले आहेत, त्यांना ‘अग्नीवीर’, असे संबोधले जाईल. प्रारंभीला वर्ष २०२२ मध्ये सरकारने ४० सहस्र अग्नीविरांची भरती करण्याचे नियोजन केले होते. कायमस्वरूपी भरती केलेले आणि अग्नीवीर यांचे अपेक्षित प्रमाण ५०ः५० होईपर्यंत अग्नीविरांच्या भरतीचे प्रमाण हळूहळू वाढवत नेले जाईल. या योजनेमुळे लष्करात भरती होणार्‍यांचे सरासरी वय ३२ वर्षांवरून २४ ते २६ वर्षे असे न्यून करता येईल, असा अंदाज केला गेला.

१३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘काय आहे अग्नीपथ योजना ? आणि योजनेतील अग्नीविरांना कोणते लाभ मिळणार आहेत ? अन् ‘अग्नीपथ’ योजनेविषयी केली जाणारी टीका आणि त्यावरील खंडण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/813723.html

३. नोकरीच्या अर्जांविषयीचे मूल्यमापन

मेजर जनरल (श्री.) म्रिणाल सुमन (निवृत्त)

एखाद्या नोकरीविषयी किती आकर्षण आहे, हे त्या नोकरीसाठी अर्ज करणार्‍यांचे प्रमाण किती आहे, यावरून लक्षात येते. या आकड्यांवरून दिलेल्या जागेसाठी अर्ज करण्यास किती उमदेवार इच्छुक आहेत, हे दिसून येते. वर्ष २०२४ मध्ये भारतीय लष्कराकडून अग्नीविरांच्या भरतीसाठी घोषित केलेल्या अधिसूचनेमध्ये २५ सहस्र जागा भरायच्या होत्या आणि त्यासाठी १२ लाख ८० सहस्र अर्ज आले होते. वर्ष २०२३ मध्ये ११ लाख ३० सहस्र अर्ज आले होते. वर्ष २०२४ मध्ये हे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले. यावरून ‘अग्नीवीर’ योजनेची लोकप्रियता वाढत आहे आणि यावर टीका करणार्‍यांकडून दाखवली जाणारी भीती न्यून होत आहे. हवाई दलामध्ये हे प्रमाण अजून चांगले आहे. तिथे ३ सहस्र जागांसाठी ७ लाख ५० सहस्र अर्ज आले आहेत.

प्रत्येक भरतीमध्ये काही जागा या त्या युनिटच्या मुख्य कार्यालयाकडून राखीव ठेवलेल्या असतात. या जागा युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी आणि किंवा त्यांचा मुलगा किंवा माजी सैनिक किंवा नोकरी असलेल्या सैनिकांच्या भावासाठी राखीव ठेवलेल्या असतात. याही जागांसाठी अनेक अर्ज येत असतात. नोकरीत असलेले सैनिक ज्यांना या योजनेविषयी पूर्ण माहिती आहे अन् त्यांनाही या योजनेविषयी आकर्षण आहे, हे यावरून सिद्ध होते. जेव्हा मुंबईला ‘सॅपर्स सेंटर’मध्ये अग्नीविरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण चालू होते. मी तेथील प्रशिक्षण देणार्‍या अधिकार्‍यांशी या प्रशिक्षणार्थींची शारीरिक आणि शैक्षणिक योग्यता, उत्साह, दृढनिश्चय अन् प्रगती करण्याची तीव्र इच्छा यांविषयी अनौपचारिक चर्चा केली. त्या वेळी बहुतांश कनिष्ठ आयुक्त अधिकार्‍यांनी ‘नियमित नोकरीत असलेले सैनिक आणि अग्नीवीर यांमध्ये काहीही भेद नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

४. ‘अग्नीपथ’ योजनेविषयी तरुणांचे अभिप्राय अन् योजनेवर करण्यात येणार्‍या टीकेचा फोलपणा

(निवृत्त) बिग्रेडियर हेमंत महाजन

या योजनेमुळे रेजिमेंटमधील सैनिकांचे मनोबल, आचार आणि आत्मीयता यांवर परिणाम होईल, याची भीती काही जण व्यक्त करत होते. याविषयी आम्ही तेथील अधिकारी आणि कनिष्ठ आयुक्त अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी त्यापैकी कुणीही नकारात्मक विधान केले नाही. उलट जे अग्नीवीर त्यांच्या विभागामध्ये भरती केले होते त्यांनी अल्प कालावधीत विभागाचे प्रशिक्षण आत्मसात् केले आणि ते विभागासाठी मौल्यवान अन् महत्त्वाचे ठरले. थोडक्यात सांगायचे झाले, तर अग्नीवीर या योजनेमुळे लष्कराच्या युद्धविषयक परिणामकारकतेवर काहीही वाईट प्रभाव पडला नाही. उलट अग्नीवीर म्हणून त्यांची निवड योग्य ठरली. सहजपणे त्यांच्याशी केलेल्या वार्तालापावरून सर्व अग्नीविरांमध्ये आत्मविश्वास होता आणि या योजनेत सहभागी होण्याविषयी त्यांनी दिलेली कारणे पटण्यासारखी होती.

अनेक अग्नीवीर म्हणाले, ‘‘ही योजना पुष्कळ लाभदायक असल्याने आम्ही आपणहून मोकळ्या मनाने या ठिकाणी आलो आहोत.’’ अनेक जणांनी केवळ ४ वर्षांसाठी ही नोकरी करून त्यानंतर मिळणार्‍या ११ लाखांच्या निधीतून नवीन उद्योग चालू करण्याची इच्छा व्यक्त केली. स्वतःचे विचार आणि भविष्यातील योजना यांविषयी त्यांचे म्हणणे स्पष्ट होते. त्यांच्या मनामध्ये कोणताही गोंधळ नव्हता. त्यांच्या पैकी काही जणांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे होत्या :

अ. अग्नीवीर ही मानाची पदवी आहे आणि मी ती मिळवणार आहे.

आ. माझ्यासाठी ही ४ वर्षांची साहसी मोहीम असेल आणि मी त्याची वाट पहात आहे.

इ. मी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सेवा निधीमधून मी शिकवणी वर्गातून शिकवणी घेईन आणि त्यानंतर नागरी सेवा परीक्षेला बसणार आहे. अग्नीवीर प्रशिक्षणामुळे माझ्या महत्त्वाकांक्षा अजून वाढतील.

ई. मी विज्ञान शाखेचा पदवीधर असून मी ‘इलेक्ट्रॉनिक स्वीच’ सिद्ध करण्याविषयीचा व्यवसाय करू इच्छितो. माझ्याकडे भांडवल नाही. सेवा निधीमधून मला आर्थिक साहाय्य मिळेल.

उ. मला सैनिक म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळवायची आहे. जर मी यात अयशस्वी झालो, तर मी दुसर्‍या क्षेत्रात कौशल्य मिळवण्यासाठी सरकारी योजनेखाली व्यावसायिक शिक्षण उपक्रम करीन.

जेव्हा त्यांना ‘भविष्यातील भवितव्याविषयी अनिश्चितता आहे’, असे विचारले, तेव्हा या सर्वांचे उत्तर समान होते, ‘‘जर अधिकारी लोक ५ वर्षांसाठी येतात, तर आम्हाला कसली भीती ! ‘कोणत्याही परिस्थितीत अग्नीवीर योजनेमध्ये रूजू व्हा’, असे म्हणून आम्हाला कुणीही बळजोरी करत नाही.

वरील चर्चेवरून असे दिसते की, ‘अग्नीपथ’ या योजनेला मुद्दामहून विरोध करणारे असूनही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. जसजशी या मोहिमेची योग्य पार्श्वभूमी सिद्ध होईल, तसतसे अजून हुशार तरुण लष्कराकडे आकर्षित होतील. लष्कर त्याविषयी अतिशय उत्साही असेल. प्रत्येक विभागामध्ये उत्साह असलेले, चांगले शिक्षित आणि तांत्रिक शिक्षण घेतलेले तरुण असून ते लष्करामध्ये नोकरीसाठी असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी प्रयत्न करत आहेत. अंतिम निवड ही गुणवत्ता आणि कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे लष्करामध्ये कायमस्वरूपी नोकरीसाठी चांगल्या दर्जाचे उमदेवार मिळतील, तसेच अग्नीवीर म्हणून प्रशिक्षण घेऊन परत आलेल्यांचा समाजाला आणि देशाला लाभ होईल. त्यांच्यामधील राष्ट्राविषयीची भावना आणि कामातील शिस्त यांमुळे ते विविध क्षेत्रांमध्ये काम करून देशाच्या उन्नतीसाठी हातभार लावतील. ते राष्ट्रासाठी अमूल्य अशी संपत्ती ठरतील. समाजामध्ये अग्नीविरांना एक विशेष स्थान प्राप्त होईल. समाज त्यांच्याकडे आदराने पाहील. खरे म्हणजे तरुणांसाठी ते आदर्श ठरतील आणि या योजनेत सहभागी होण्यास स्फूर्तीदायक ठरतील.

५. ‘अग्नीपथ’ योजनेला होणारा विरोध हा न्याय सुसंगत आणि तर्कशुद्ध नाही !

ज्यांना सुधारणेविषयी शत्रूत्व आहे आणि प्रगतीमध्ये अडथळा आणणे, हा ज्यांचा एकमेव हेतू आहे, त्यांचा ‘अग्नीपथ’ योजनेला विरोध असणे अपेक्षित आहे. त्यांच्या या विरोधाला कोणतेही न्याय आणि तर्कशुद्ध कारण नाही. वरवर पहाता त्यांची कारणे विदेशी निरर्थक गैरसमजांवर आहेत. ‘अग्नीवीर योजना ही गरीब, समाजातील मागासलेले वर्ग आणि अल्पसंख्याकांसाठी आहे अन् सैन्यातील नियमित स्वरूपाची नोकरी ही विशेष वर्गांसाठी आहे’, अशी अफवा काही राष्ट्रविरोधी शक्ती पसरवत आहेत. यातील काहीही सत्य नाही; कारण आता नियमित भरती होणार नाही. ‘सैन्यात भरती व्हायचे असेल, तर ते ‘अग्नीपथ’ योजनेतून होता येणार आहे आणि ही योजना सर्व भारतियांसाठी खुली आहे. त्यामध्ये जात, विभाग आणि धर्म याला कोणतेही स्थान नाही.’ वरवर पहाता अशी चुकीची माहिती पसरवून मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शेवटी केवळ नेहमीचा राज्यकारभार न पहाता यंत्रणा सुधारण्यासाठी धाडसी आणि मूलगामी निर्णय घेणे, ही राष्ट्रीय नेतृत्वाची खरी कसोटी आहे. संशोधनात्मक धोरणामध्ये पुढाकार घेणे आणि ठोस कृतीविषयी निर्णय घेणे, हे आहे त्या स्थितीत रहाण्याची मानसिकता असलेले पूर्ण करू शकत नाहीत. भरतीविषयक धोरणामध्ये दूरदृष्टी ठेवून केलेल्या या सुधारणेचे श्रेय सरकारला जाते. (समाप्त)

– मेजर जनरल (श्री.) म्रिणाल सुमन (निवृत्त) आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.