दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : चुलतभावाकडून बहिणीवर अत्याचार; पनवेल येथे २०० खाटांचे शासकीय रुग्णालय प्रस्तावित !…
चुलतभावाकडून बहिणीवर अत्याचार
पनवेल – सुकापूर परिसरातील मालेवाडी भागातील एका तरुणाने चुलत बहिणीला प्रेमसंबंधात गुंतवले. मागील वर्षी ३० ऑक्टोबर ते या वर्षी १७ जून या कालावधीत त्याने भाड्याने वेगळे घर घेऊन तिच्यावार सातत्याने अत्याचार केला. खांदेश्वर पोलीस ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
________________________________________________________________________________________________________
पनवेल येथे २०० खाटांचे शासकीय रुग्णालय प्रस्तावित !
पनवेल – येथे २०० खाटांच्या रुग्णालयाच्या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य विभागाने तत्त्वतः संमती दिली आहे. रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी या संदर्भात प्रस्ताव पाठवला होता. नव्या रुग्णालयासाठी ५ एकर जागा लागेल. रुग्णालयासाठी बांधकाम आणि पदनिर्मिती करण्यासाठी आरोग्य विभाग कार्यवाही करेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकामाचे अंदाजपत्रक आणि आराखडे सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काही वर्षांत पनवेलची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक होणार असल्याने या रुग्णालयामुळे पनवेलकरांची भविष्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट होईल, असे म्हटले जात आहे.
________________________________________________________________________________________________________
विरार येथे खड्ड्यामुळे दुचाकी घसरून महिला दगावली !
वसई – खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. तेरेजा लोपीस (वय ५७ वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. विरार पश्चिमेस जकात नाका येथे हा अपघात घडला. खड्ड्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी ‘आप’ पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी केली आहे.
________________________________________________________________________________________________________
डोंबिवलीत तलवारधारी तरुणांची भीती !
डोंबिवली – येथील एम्.आय.डी.सी.तील आजदेपाडा भागात १३ जुलैच्या मध्यरात्री ३ तरुण तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याचा प्रकार सामाजिक माध्यमातील चित्रफितीतून उघड झाला आहे. आजदेपाडा भागातील काही घरांसमोरील सीसीटीव्हीत याचे चित्रण चित्रीत झाले आहे.
या तरुणांना अटक करण्याची मागणी आजदेपाडा भागातील नागरिकांनी केली आहे. हे तरुण पळत असल्याने या भागात आडोशाला बसलेली भटकी कुत्री भुंकायला लागली, म्हणून काही रहिवाशांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले, तर काही तरुण हातात तलवार घेऊन पाठोपाठ धावत असल्याचे दिसून आले. हे तरुण ज्या गल्लीमधील रस्त्याने धावत गेले, त्याच रस्त्याने ते पुन्हा काही वेळाने हातात तलवारी घेऊन परत आले.
________________________________________________________________________________________
अमरावती शहरात बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात !
अमरावती – येथे शहरी भागातील बसचे ब्रेक निकामी झालेल्या बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत एका ९ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर घायाळ झाले आहेत. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडली. या घटनेनंतर जमावाकडून बसची तोडफोड करण्यात आली