गुरुपौर्णिमा आणि श्री गुरु यांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व !
१. महर्षि व्यास यांचे अलौकिकत्व !
‘आषाढ पौर्णिमेचा दिवस हा ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘व्यास जयंती’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ‘गुरुपूजन’ केले जाते. महर्षि वेदव्यास हे पराशरऋषि आणि सत्यवती यांचे सुपुत्र होते.
१ अ. मानवजातीच्या कल्याणासाठी महर्षि व्यासांनी हिंदु धर्मातील उत्तम तत्त्वज्ञान १८ पुराणांच्या रूपाने देणे आणि गुरु-शिष्य परंपरा चालू करणे : महर्षि व्यासांनी हिंदु तत्त्वज्ञानात जे जे उत्तम आहे, त्याची साररूपाने १८ पुराणे मानवजातीला दिली. व्यासांच्या प्रतिभेतून महाभारताचे कमळ निर्माण झाले. त्या कमळाचा सुवास म्हणजे गीतेचे तत्त्वज्ञान होय ! मानवजातीच्या अखंड कल्याणाची दृष्टी ठेवून वैदिक तत्त्वज्ञानाची ज्ञानगंगा सतत वहात रहावी; म्हणून श्री वेदव्यासांनी गुरु-शिष्य परंपरा प्रथम चालू केली. वैदिक रत्नांनी काळाचे आघात सहन करून आपले तेज सदैव राखावे; म्हणून हा गुरु-शिष्य परंपरेचा प्रयत्न !
१ आ. काळाच्या ओघात जगभरातील अनेक संस्कृती लयाला जाणे; मात्र गुरु-शिष्य परंपरा अखंड टिकून रहाणे : वसिष्ठऋषींनी प्रभु श्रीरामचंद्रांना उपदेश केला. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘श्रीरामा, मी तुझेच ज्ञान तुला देणार आहे. तू माझे शिष्यत्व पत्करलेस; कारण तुला गुरु-शिष्य परंपरेची मर्यादा सांभाळायची आहे.’ जवळजवळ ५ सहस्र वर्षे व्यासांनी केलेले मार्गदर्शनपर विचार आणि आदर्श यांवर भारत जगत आहे. आपण पहातोच आहोत, या परंपरेविना जगातील कितीतरी संस्कृती अल्पकालीन ठरल्या आणि काळाच्या उदरात गडप झाल्या.
२. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागील मीमांसा
२ अ. उत्तम ज्ञान मिळावे आणि गुरुकृपा यांसाठी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाणे : महर्षि व्यासांनी त्यांचे शिष्योत्तम सुमंतु, वैशंपायन, जैमिनी आणि पैला यांना अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद शिकवला. ‘पाचवा वेद’ असे ज्याला म्हटले जाते, त्या महाभारताची रचना केल्यावर महर्षि व्यासांनी ते महर्षि लौम यांना शिकवले. महर्षि व्यासांनी महाभागवताची रचना केली आणि ते आपला प्रिय पुत्र शुकब्रह्म याला शिकवले. महर्षि व्यासांनी वेदांतील ज्ञान दिले, यासाठी श्री गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करून त्यांचे आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी आपण व्यास जयंती साजरी करतो.
२ आ. व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् । : महर्षि व्यासांनी १८ पुराणांची रचना करून भक्तीमार्ग सुलभ केला. कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य यांनी भगवान वेदव्यासांना हिंदु धर्माचे ‘मूळ पुरुष’ म्हटले आहे. विस्ताराने सांगतो तो ‘व्यास’ ! व्यासांइतका हिंदु तत्त्वज्ञानाचा विस्तार कुणी केला नाही. असा एकही मानवी सद्गुण अथवा दुर्गुण नाही किंवा जीवनातील अशी एकही समस्या नाही, जीवनातील असा एकही मानवी व्यवहार नाही की, ज्यावर महर्षि व्यासांनी मार्गदर्शन केले नाही; म्हणून ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ।’, असे म्हटले जाते. यासाठीच सांस्कृतिक विचार ज्या पिठावर बसून सांगितले जातात, त्या पिठाला ‘व्यासपीठ’, असे म्हणतात.
२ इ. साधनेचा आरंभ करण्यास अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! : पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पूर्ण विकास झालेला असतो, तसा श्री गुरूंचा ज्ञानचंद्र पूर्ण विकसित होऊन सतत चमकत असतो. त्यांच्यामुळे आमच्या अंतःकरणातील अज्ञान आणि अंधकार नष्ट होतो. गुरुपौर्णिमेपासून पुढे चातुर्मास चालू होतो. आचार्य ज्ञान आणि धर्म यांच्या प्रचारासाठी या मुहूर्तावर आश्रमाबाहेर पडतात. ते ४ महिने परत येत नाहीत; म्हणून या दिवशी ‘गुरुपूजन’ करायचे. साधनेचा आरंभ करण्यास हा अत्यंत शुभ दिवस आहे.
३. गुरु-शिष्य परंपरा गंगेच्या प्रवाहासारखी अतीप्राचीन
वैदिक काळापासून आजपर्यंत सतत चालू असलेल्या ऋषिमुनींच्या परंपरेतील शेवटचा दुवा म्हणजे ‘गुरु’ ! पूर्वापार चालत आलेल्या ज्ञानाची मशाल तो सतत तेवत ठेवतो आणि नंतर हाच संदेश अनंत काळापर्यंत पुढे नेण्यासाठी आपल्या योग्य शिष्याच्या हाती ही मशाल सोपवतो. ही गुरु-शिष्य परंपरा गंगेच्या प्रवाहासारखी अतीप्राचीन आहे. गंगेचे पाणी पालटते; मात्र प्रवाह तोच असतो. तसेच या परंपरेत गुरु पालटतात, तरी ज्ञान तेच रहाते. गुरु ही मूर्ती नाही, आदर्श आहे ! गुरु ही व्यक्ती नाही, शक्ती आहे ! गुरुपूजा ही व्यक्तीपूजा नसून गुरु-शिष्य परंपरेची पूजा आहे.
४. श्री गुरु म्हणजे मनुष्याला अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमृतत्त्वाकडे घेऊन जाणारी शक्ती !
आमच्या हृदयातील अंतरात्म्याशी असलेले आमचे नाते, म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धी यांच्या मर्यादा ओलांडून श्री गुरूंशी स्थापित झालेले आमचे नाते होय ! ज्या अज्ञानाच्या पडद्यामुळे मी सतत माझ्यापासून दूर भटकतो, ते अज्ञान नष्ट करून जो मला आत्मदर्शन घडवतो, तो गुरु ! गुरुकृपेच्या उबेमुळे वासनांची कवचे हळूहळू वितळून जातात आणि शेवटी रहाते ते आपलेच सच्चिदानंद स्वरूप ! सद्गुरूंच्या समागमाने बुद्धीत वैराग्याचा गर्भ रहातो. ब्रह्मविद्येचे डोहाळे लागतात. आत्मज्ञान ही सद्गुरूंची देणगी होय. गुरु साधकाला असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमृतत्वाकडे घेऊन जातात. ‘अभय’ ही सद्गुरूंची आणखी एक देणगी ! सत्याचे ज्ञान झाले, म्हणजे शरीर पंचतत्वामध्ये विलीन होण्याची, म्हणजे मरणाची भीती रहात नाही.’
मज शरण रिघाल्या वाडेंकोडें ।
कळिकाळ तुझिया पायां पडे ।
कायसे भवभय बापुडें । कोण तुजकडे पाहेल ।।
– एकनाथी भागवत, अध्याय १२, श्लोक २६०
अर्थ : मला प्रेमाने शरण आलास, तर कळिकाळसुद्धा तुझ्या पाया पडेल. मग बिचारे संसाराचे भय ते किती ? तुझ्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याची कुणाची छाती आहे ?
५. मायेतील नाती बंधनात टाकतात, तर श्री गुरु बंधनातून मुक्त करतात !
श्री गुरु आपल्याला आपल्या मनापेक्षाही जवळ आहेत. भक्तीच्या रेशमी धाग्यांनी तुमचे मन गुरुचरणांना बांधून टाका. शुद्ध प्रेमाच्या पाण्याने श्री गुरूंचे चरण धुऊन काढा. आपल्या दैवी गुणांच्या फुलांच्या माळेने श्री गुरूंना सुशोभित करा. माता-पिता, बहीण-भाऊ, सगे-सोयरे ही सर्व नाती श्री गुरूंमध्ये एकत्रित होतात. सांसारिक दृष्टीने ही नाती शारीरिक असल्याने बंधनात टाकतात, तर श्री गुरु या सर्व बंधनांपासून मुक्त करतात.
गुरुचरण हेच वैकुंठ, तोच गोलोक अन् तोच कैलास होय ! श्री गुरूंचा कृपाकटाक्ष म्हणजे अमृताचा वर्षाव ! अंतःकरणावरचे झाकण उघडा आणि ते अमृत काठोकाठ भरून घ्या. गुरुकृपेनेच अंतःकरणात आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. तुम्ही सत्यधामाच्या यात्रेस निघाला आहात. सर्व जण तुम्हास वाटेत सोडून जातील. ‘सगळे सोडून देतील हात । तुजवीण मागू कुणाला साथ ।।’ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज) अशी अवस्था होते. या यात्रेत शेवटच्या टप्प्यापर्यंत केवळ श्री गुरुच तुमची साथ देतो. मायेच्या पडद्यामुळे सद्गुरूंचे दर्शन होत नाही. हा पडदा दूर करण्यासाठी श्री गुरूंची अत्यंत तळमळीने आणि मनापासून प्रार्थना करा.
६. भवसागर पार पडण्यासाठी श्री गुरूंचा आधार आवश्यक !
गुरुरूपी नौकेच्या आधाराने पैलतीर सहज गाठता येतो. गुरु चिंतनात चित्ताला मग्न केले, तर चिंता आपोआप चिंतनाचे स्वरूप घेते. लहान मूल चालायला आरंभ करते, तेव्हा प्रथम तोल सांभाळण्यासाठी ते पांगुळगाड्याचा आधार घेते. म्हातारपणी तोल सांभाळण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागतो. तद्वत आयुष्यात समतोल सांभाळण्यासाठी श्री गुरूंचा आधार हवाच !
प्रवृत्तिनिवृत्तिकृत कार्या । अवश्य पाहिजे आचार्या ।
आपमतीं भजतां राया । अनेक अपायांमाजीं पडे ।।
– एकनाथी भागवत, अध्याय ३, शलोक ८०६
अर्थ : प्रवृत्ती किंवा निवृत्ती या कर्तव्यांचे ज्ञान करून देण्यासाठी गुरु अवश्य पाहिजे. हे राजा, मार्गदर्शक आचार्यांवाचून आपल्याच बुद्धीने कर्मे आचरली असतां तो भक्त निःसंशय अनेक संकटांत पडतो.
७. आयुष्याचा गुंता सोडवण्यासाठी श्री गुरूंचे मार्गदर्शनच उपयोगी !
गुंता सोडवायचा असेल, तर त्यातील कुठला दोरा ओढायचा ? हे ठाऊक असले पाहिजे, नाहीतर गुंता अधिक गुंतागुंतीचा होतो. हा योग्य दोरा कुठला ? हे श्री गुरुच दाखवतात. नमनाने अमन, म्हणजे शांती आणि ध्यानाने उन्मन झाल्याखेरीज श्री गुरूंशी तन्मय होता येत नाही. नमन ज्ञानयुक्त हवे आणि नमन कुणाला करतो ? ते समजायला हवे. देहाचे देऊळ करून त्यात गुरुमूर्ती स्थापण्याआधी या देहाची शुद्धी करावयास हवी. गुरुत्वाकर्षणाप्रमाणे गुरुतत्त्वाचे आकर्षण असते. चढण जशी चढणार्याला हळूहळू वर घेऊन जाते, तसे गुरु साधकाला हळूहळू उन्नतीच्या मार्गाला लावतात. स्वतःचा रोग जाण्यासाठी स्वतःच औषध घ्यावे लागते, तसेच त्रिविध तापांपासून मुक्ती हवी असेल, तर स्वतःच गुरुभक्ती करायला हवी.
८. पूर्वसुकृत फळाला आल्यावरच सद्गुरूंची भेट होते
आमचा मूळ देश ब्रह्मदेश. तेथून आम्हास विकार चोरांनी पकडून आणले. नश्वर विषय वासनेने आमचे डोळे बांधले आणि आम्हास घोर अज्ञान अरण्यात सोडून दिले. आम्हास कुणीतरी साहाय्य करावे आणि ब्रह्माकडे जाण्याची वाट दाखवावी; म्हणून आम्ही आक्रोश करू लागतो. पूर्वसुकृत फळास आले की, सद्गुरूंची गाठ पडते. ते आमच्या डोळ्यांवरची पट्टी सोडतात आणि मूळ ब्रह्मदेशात घेऊन जातात.
अशा त्या गुरूंच्या गुरूंना, भगवान वेदव्यासांना आमचे वंदन असो ! गुरुपरंपरेला वंदन असो !’
– श्री. दामोदर दत्तात्रय कुलकर्णी
(साभार : मासिक ‘जीवन विकास’)
‘अहंभाव’ सोडून गुरुभावात समर्पित होणे’, हीच गुरुसेवा !शून्याच्या मागे आकडा नसेल, तर शून्याला किंमत नसते. तसे शून्यवत जगाला अर्थ येतो तो श्री गुरूंमुळेच ! श्री गुरुकृपेने आपत्ती ही इष्टापत्ती होते आणि कष्ट इष्ट होतात. ‘गुरु’ मधील ‘गु’ या अक्षराने ‘गुणातीत’ आणि ‘रु’ या अक्षराने ‘रूपातीत’ स्वरूप निर्देशित होते. जो गुणरूपाच्या पलीकडील म्हणजे निर्गुण आणि निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो तो गुरु ! संस्कृतीचा गौरव शिकवतो तो गुरु ! आपले हात जोडून म्हणजे दोन हातांच्या द्वैतातून नमस्काराचे अद्वैत साधून साधकाने श्री गुरूंना शरण जावे. श्री गुरु सुगंधित फूल आहे. शिष्य भुंगा आहे. त्याची गुरुभक्ती हा गुंजारव आहे. अग्नी सुकी आणि ओली सर्व लाकडे जाळतो. त्याचप्रमाणे गुरुचरणी शरणागत झाल्यावर सर्व संचित कर्मे भस्म होतात; म्हणून श्री गुरूंचे स्मरण म्हणून कपाळास भस्म किंवा तिलक लावावे. बर्फ विरघळून पाण्याशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ‘अहंभाव’ सोडून गुरुभावात समर्पण हीच गुरुसेवा होय ! श्री गुरूंच्या सतत चिंतनाने ‘अळी-सुरवंट’ या न्यायाने साधकही गुरुत्व प्राप्त करू शकतो. श्वासोच्छ्वास २४ घंटे चाललेला असतोच. त्यात ‘गुरुस्मरण’ गुंफता आले, अजपा-जप करता आला, तर झोपेतही गुरुभक्ती होते. मधमाशी मधाविना इतरत्र बसतच नाही. तसा गुरुभक्त गुरुभक्तीविना इतर काही करतच नाही. – श्री. दामोदर दत्तात्रय कुलकर्णी |