भक्तीपरंपरेमुळे आक्रमकांपासून झाले भारतातील हिंदु संस्कृतीचे रक्षण !
भारताला भक्तीमार्गानुसार ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्यांची मोठी परंपरा आणि मोठा वारसा लाभला आहे. अनेक शतकांचा हा वारसा आहे. यात भक्तीमार्गी संतांचे श्लोक, त्यांनी रचलेली स्तोत्रे, भजने आपण म्हणतो. त्यांचा भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अगदी प्राथमिक साधकापासून ते उन्नत साधकापर्यंत त्यांच्या वचनांचा अभ्यास करतात; मात्र याच भक्तीमार्गी संतांनी भारतावरील आक्रमणांच्या काळात मोठे कार्य केले आहे. त्यावर प्रकाश टाकून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न !
१. भारतावरील विविध आक्रमणे !
भारतात भक्तीमार्गी संतांची परंपरा फार पूर्वीपासून आहे. भगवान श्रीकृष्णाची परमभक्त असलेली ‘राधा’ ही द्वापरयुगात म्हणजेच ५ सहस्र वर्षांपूर्वी भारतभूमीत श्रीकृष्णभक्तीची मूळ प्रेरणा ठरली. त्यानंतरच्या काळात म्हणजे ख्रिस्तपूर्व इतिहासातील उल्लेख उपलब्ध नसले, तरी नंतरच्या शतकातील भक्तीमार्गियांचे उल्लेख उपलब्ध आहेत. उपलब्ध माहितीनुसार भक्तीपरंपरेचा प्रारंभ ८ व्या शतकात मानला जातो. ८ व्या ते १६ व्या शतकापर्यंत भारतातील भक्तीपरंपरेला बहर आला होता. भारतावरील परकीय आक्रमकांचा विचार करता भारतावर हूण, पर्शियन, ग्रीक त्यानंतर वर्ष ७११ मध्ये महंमद बिन कासीम याने क्रूर आक्रमण केले. त्यानंतर अरब, अफगाणी, तुर्की, मंगोल, इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी आक्रमणे केली. भारत जगातील एकमेव देश असेल की, ज्या देशावर एवढ्या विविध प्रकारच्या आक्रमकांनी अनेक शतके आक्रमणे केली.
बहुतांश आक्रमणे इस्लामी होती आणि इस्लामी आक्रमक, राज्यकर्ते ज्यामध्ये महंमद घोरी, गझनी, चेंगिजखान, बाबर, अकबर, औरंगजेब हे अत्यंत क्रूर आणि हिंदूंशी पशूंशी करतो तसा व्यवहार करणारे होते. त्यांच्या कार्यकाळात हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. हिंदूंची घरे जाळणे, संपत्तीची हानी करणे, हिंदूंची हत्याकांडे करणे, हिंदु स्त्रिया-मुली यांवर अत्याचार करणे, हिंदूंच्या सण-उत्सवांवर निर्बंध लादणे, हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना करणे, मंदिरे पाडणे असे प्रकार त्यांनी केले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले, म्हणजेच इस्लामचा बळजोरीने प्रसार करण्याचे, दहशत पसरवण्याचे वातावरण होते. हिंदूंची स्थिती दु:खी, कष्टी, पिचलेली, निराशेच्या गर्तेत गेलेली अशी होती. हिंदूंपुढे भयावह भविष्यकाळ होता आणि नरकयातनामय जीवन होते.
२. भक्तीमार्गाच्या प्रसाराची आवश्यकता !
अशा भयावह काळात ८ व्या शतकामध्ये भक्तीपरंपरेचा उदय झाला, असे मानले जाते. वैयक्तिक स्तरावर हिंदु धर्मीय देवतेची उपासना, पूजाअर्चा करतच होता; मात्र या उपासनेला व्यापक रूप देण्याचे कार्य भक्तीपरंपरेने केले. हिंदूंची कर्मकांडाप्रमाणे म्हणजे यज्ञयागादी उपासना चालू होती; मात्र आक्रमकांमुळे ती करणे कठीण होऊन बसल्यामुळे हिंदूंना देवाच्या आधाराची, देवाशी सोप्या उपासनामार्गाद्वारे अनुसंधान साधण्याची आवश्यकता निर्माण झाली. अशा वेळी त्यांना भक्तीमार्गाने आधार दिला.
दुसरे एक कारण म्हणजे जातीव्यवस्था मानल्यामुळे आणि त्यात अडकल्यामुळे काही भागांमध्ये जात्यंधपणाही वाढला होता. परिणामी हिंदू विखुरले गेले होते. तेव्हा हिंदूंना ऊर्जा देणारी, एकसंध आणू शकणारी भक्तीपरंपरा निर्माण झाली आणि तिने वेग पकडला. आदी शंकराचार्य, संत रामानंद, संत मीराबाई, संत सूरदास, गुरु रविदास, संत कबीर, वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभु, संत नरसिंह मेहता इत्यादी संत कार्यरत झाले. आदी शंकराचार्यांनी तर जवळजवळ प्रत्येक देवतेची स्तुतीपर स्तोत्रे लिहून ठेवली आहेत. जी आजही भक्तीभावाने म्हटली जातात.
महाराष्ट्रात भागवत संप्रदायाच्या, म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावता माळी इत्यादी संतपरंपरा निर्माण झाली. समर्थ रामदासस्वामींचे कार्य चालू झाले. समर्थ रामदासस्वामी यांनी जवळजवळ प्रत्येक देवतेची आरती मराठीत लिहून ठेवल्यामुळे त्या आरत्या तत्कालीन आणि सध्याच्या हिंदु समाजाला देवाला आळवण्याचे माध्यम बनल्या.
दक्षिणेत रामानुजाचार्य, अल्वारस (विष्णुभक्त) आणि नयनर (शिवभक्त) इत्यादींनी देवतांची स्तुती करणारी कवने म्हणत विविध ठिकाणी भ्रमण करण्यास प्रारंभ केला. ज्या ठिकाणी त्यांनी भ्रमण केले, तेथे मंदिरे बांधली गेली, जी नंतर तीर्थक्षेत्रे बनली. संत, भक्तीमार्गी साधक यांच्यामुळे समाजाला आशेचा एक किरण सापडला. पिचलेल्या, निराशाग्रस्त आणि भयग्रस्त समाजाला या संतांनी आधार दिला.
इस्लामी आक्रमकांच्या भयामुळे समाजाचा उपासनेचा भाग अल्प झाला, अनेकांची धाकदपटशाने गावेच्या गावे धर्मांतरित करण्यात आली. मूळ वेदादी अध्ययन, धर्मग्रंथ वाचन, त्यांचा अर्थ समजून घेणे एवढी क्षमता समष्टी स्तरावर उणावल्यामुळे अनेक संतांनी साध्या-सोप्या भाषेत देवतांची स्तुतीपर भजने, तसेच समाजाला जीवनाचा उपदेश करणारे, साधना करण्यास प्रवृत्त करणारे ग्रंथ निर्माण केले. संत मीराबाईंची श्रीकृष्णावरील भजने, सूरदास, नरसिंह मेहता यांची भजने, संत तुलसीदास यांचे रामचरितमानस, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबांची गाथा, दासबोध आदी संतसाहित्य निर्माण झाले. संत नामदेव यांचे अभंग तर गुरुनानक ग्रंथात समाविष्ट करण्यात आले. समर्थ रामदासस्वामी यांनी क्षात्रतेजाच्या जागरणाचे मोठे कार्य केले.
३. भक्तीमार्गी संतांची इस्लामी आक्रमणांच्या काळात अजोड आणि अतुलनीय धर्मसेवा !
मोगल आक्रमकही या संतांची भजने ऐकण्यास येत. संत मीराबाई यांचे भजन ऐकण्यास अकबरही आला होता. संत तुलसीदास यांची कीर्ती तत्कालीन बादशहापर्यंत पोचली होती. या संतांचा एक प्रकारचा प्रभाव या परकीय बादशहांवरही होता. त्यामुळे या भक्तीमार्गी संतांना भक्तीच्या प्रसारावर मोगल आक्रमक बंधने घालू शकले नाहीत. परिणामी लोकांना चैतन्य पुरवण्याचे, धर्मचेतना जागृत करण्यात हे संत यशस्वी झाले.
सर्वसाधारणपणे एखाद्या आक्रमणकर्त्याने एखादा भूप्रदेश जिंकला, तर जेत्याचा धर्म तो तेथील धर्म बनून जातो. त्यामुळे खरेतर भारताचा मोठा भाग इस्लामी व्हायला हवा होता; मात्र हिंदु धर्मातील चैतन्यासह, हिंदु धर्मातील भक्तीपरंपरेने इस्लामचे हे असांस्कृतिक आक्रमण रोखले. महाराष्ट्रात तर समर्थ रामदासस्वामी यांनी रामभक्तीसह जागोजागी मारुतीची मंदिरे स्थापन करून बलोपासनेचा प्रसार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना सैन्यात भरती होण्यासाठी मावळे मिळाले. महाराष्ट्रात वारकरी परंपरा निर्माण केल्यामुळे आणि उत्तर अन् दक्षिण भारतातील हिंदु परंपरांमुळे बहुसंख्य हिंदु समाज धर्मांतरित होण्यापासून वाचला. म्हणजेच एकप्रकारे हिंदु धर्माचेच रक्षण झाले. भक्तीमार्गी संतांनी इस्लामी आक्रमणांच्या काळात अजोड आणि अतुलनीय धर्मसेवा करून त्या काळातील तळागाळातील हिंदूंना धीर दिला, त्यांच्या श्रद्धांचे रक्षण केले आणि त्यांच्यात धर्मचेतना जागृत केली. त्यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्याही जिहादी धर्मांध छुप्या पद्धतीने हिंदु समाजावर अत्याचार करत आहेत, ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. साम्यवादी कपटाने हिंदूंची दैवी परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही राज्यांमध्ये हिंदुद्वेषी राज्यकर्ते आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही हिंदू आणि भारतविरोधी वातावरण आहे. अशा वेळी हिंदूंना पुन्हा एकदा भक्तीमार्गाचा अवलंब, म्हणजे भक्ती करून देवाचा आश्रय घ्यावा लागणार आहे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (६.७.२०२४)