निस्सीम भक्ती करणार्या भक्तांनी अनुभवलेला भक्तीचा अगाध महिमा !
रसिकमुरारी यांची गुरुभक्ती !
रसिकमुरारी हे मोठे गुरुभक्त होते. त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने गुरुसेवा, गुरुभक्ती केली. रसिकमुरारी यांच्या गुरूंना तत्कालीन राजाने साधू-संतांची सेवा चांगल्या प्रकारे होण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून ४ गावे दान म्हणून दिली होती. काही काळाने एका लोभी ठेकेदाराला हे लक्षात आल्यावर राजाचे कान भरून ती गावे राजाकडून त्याने विकत घेतली. परिणामी साधू-संतांच्या सेवेत विघ्न निर्माण झाले. यामुळे गुरूंनी ही गावे पुन्हा मिळवण्यासाठी रसिकमुरारी यांना निरोप पाठवून आज्ञा दिली. रसिकमुरारी त्यासाठी त्यांच्या गावाहून निघाले. ठेकेदाराला हे कळल्यावर त्याने रसिकमुरारी यांच्या मार्गात एक पिसाळलेला हत्ती त्यांना ठार करण्याच्या दुष्ट हेतूने पाठवला. अन्य सर्व शिष्य आणि भक्त यांमुळे घाबरून गेले अन् रसिकमुरारी यांना गावे मिळवण्याचा विषय सोडून देण्यास सांगितले; मात्र रसिकमुरारी गुरुसेवा करण्यासाठी प्राण गेले तरी चालतील, या विचाराने तसेच पुढे जात राहिले. एका क्षणी पिसाळलेला हत्ती रसिकमुरारी यांच्याजवळ आला आणि त्यांच्यावर आक्रमण करणार, असे सर्वांना वाटत असतांना हत्ती एकदम शांत झाला आणि त्याने उलट रसिकमुरारी यांच्या चरणांशी लोटांगण घातले. हा चमत्कार पाहून अन्य भक्तही अवाक् झाले. तेथून तडक ठेकेदाराजवळ जाऊन पुन्हा गुरूंची गावे त्यांना मिळवून दिली. (संदर्भ:संकेतस्थळ)
श्रीकृष्णभक्त कृष्णाबाई !
कृष्णाबाई कृष्णाची निस्सीम भक्त होती. ती अखंड कृष्णभक्तीत दंग होती. ती श्रीकृष्णासाठी सुंदर हार बनवायची. लोकांच्या दृष्टीने ती वेडी होती. एक दिवस गावात भूकंप होईल, असा श्रीकृष्णाने तिला दृष्टांत दिला. तिने लागलीच गावात याविषयी घरोघरी जाऊन सांगण्यास प्रारंभ केला, तेव्हा तिच्यावर गावकर्यांनी विश्वास ठेवला नाही आणि तिला पुन्हा वेड्यात काढले. तिने गावातील प्रमुख लोकांना सांगून पाहिले; मात्र काही उपयोग झाला नाही. परिणामी तिने श्रीकृष्णाचा दृष्टांत प्रमाण मानून स्वत:ची सिद्धता चालू केली. घरातील सर्व सामान बैलगाडीवर बांधून ती गावातून निघाली, तेवढ्यात श्रीकृष्णाने तिला तिची हार बनवण्याची सुई घरीच राहिल्याची आठवण करून दिली. तेव्हा ती पुन्हा घरी परतली आणि सुई घेतली अन् पुन्हा लगबगीने बैलगाडीतून मार्गस्थ झाली. तिने गावाची सीमा ओलांडली न ओलांडली, तेथे मोठा भूकंप झाला आणि तिचे संपूर्ण गाव भूमीत गडप झाले. कृष्णाबाईने कृष्णभक्तीत रंगून श्रीकृष्णाची प्रत्येक आज्ञा शिरोधार्य मानून कृती केल्याने काळही तिचे काही करू शकला नाही. (संदर्भ : संकेतस्थळ)
जगन्नाथभक्त कर्माबाई !
कर्माबाई यांचे आई-वडील पुष्कळ धार्मिक होते आणि ते नेहमी देवाला नेवैद्य दाखवूनच स्वत: भोजन करत. एकदा त्यांना तीर्थयात्रेला जायचे असल्याने त्यांनी त्यांची मुलगी कर्माबाई हिला ती सेवा सांगितली आणि ‘देवाला नेवैद्य दाखवल्याविना भोजन करायचे नाही’, असे सांगितले. आई-वडील तीर्थयात्रेला गेल्यावर कर्माबाईने खिचडी बनवली आणि ती देवाजवळ ठेवली अन् देवाला ग्रहण करण्यासाठी प्रार्थना केली. तिचा भोळाभाव असल्याने तिने देवाला ‘तू भोजन करत नाही, तोपर्यंत मी करणार नाही’, असे सांगितले आणि देवाची आर्ततेने वाट पहात राहिली. शेवटी काही वेळाने देवाने नेवैद्य ग्रहण केला. त्यानंतर प्रतिदिनच देव येऊन नेवैद्य ग्रहण करू लागला. कर्माबाईचे आई-वडील आल्यावर तिने त्यांना हा दिनक्रम सांगितला, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि ‘आपण ज्या देवाला भेटण्यासाठी तीर्थयात्रा करण्यास गेलो होतो, तो प्रत्यक्ष लहान मुलीच्या हातचा नेवैद्य ग्रहण करण्यासाठी घरीच येत आहे’, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. कर्माबाईची ही सेवा ती मोठी होईपर्यंत चालूच राहिली. ती जगन्नाथपुरी येथे स्थलांतरीत झाल्यावर एक दिवस तिच्याकडे एक साधू महाराज आले. त्यांनी कर्माबाईचा हा दिनक्रम पाहिल्यावर तिला म्हणाले, ‘‘देवासाठी पूर्ण शुचिर्भूत होऊन आणि स्नान करून सोवळ्यात नेवैद्य बनवला पाहिजे.’’ तेव्हा कर्माबाईने तसे करण्यास प्रारंभ केला; मात्र त्यामुळे तिला खिचडी बनवण्यास विलंब होऊ लागला आणि देवाला खिचडीची वाट पहात रहावे लागायचे. एकदा असाच विलंब झाल्यावर देव घाईत खिचडी खाऊन देवळात आला. काही शिते देवाच्या मुखाला तशीच राहिली होती. पुजार्यांनी मूर्तीकडे पाहिल्यावर त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. देवाने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की, ‘त्यांच्या भक्ताकडे आलेल्या एका साधूंनी आवश्यकता नसतांना कर्मकांडाचे नियम पाळून माझ्या भक्ताला माझ्यासाठी नेवैद्य बनवण्यास सांगितल्यामुळे मला भोजन मिळण्यास विलंब होत आहे.’ पुजार्यांनी शोध घेऊन कर्माबाईंकडे आलेल्या साधूंना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांना त्यांची चूक समजली. त्यानंतर कर्माबाईंचा दिनक्रम पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू राहिला आणि एक दिवस त्या जगन्नाथात विलीन झाल्या. त्या दिवशी जगन्नाथाच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागल्यावर पुजार्याने विचारले. तेव्हा देवाने सांगितले की, माझी निस्सीम भक्त कर्माबाई आता या जगात राहिली नाही. आता मला भक्ती ओतून बनवलेली खिचडी कोण देणार ? तेव्हापासून जगन्नाथाला खिचडीचा नेवैद्य देण्याची परंपरा चालू झाली जी आजतागायत चालू आहे. धन्य ती भक्त कर्माबाई जिच्या हातचा नेवैद्य ग्रहण करण्यास साक्षात् जगन्नाथ यायचे !
(संदर्भ : सनातनचा भक्तीसत्संग)