भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे !           

प.प. भगवान श्रीधरस्वामी   

भक्तीचे महत्त्व भक्तच जाणू शकतो. ते शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. भक्तीचे वर्णन करावयास मानवी शब्द न्यूनच पडतील. भक्ती भक्तांच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवाने समजू शकते. स्वानुभवानेच अनुभवता येणार्‍या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या. भक्तीमार्ग सर्वांना अनुकूल असाच आहे. सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम आणि निरवधी सुखदायक आहे.

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

देवाला ओळखणे !

१. भगवंत आणि बीजगणित : ‘बीजगणितामध्ये उदाहरण सोडवतांना एक अज्ञात ‘क्ष’ घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या ‘क्ष’ची खरी किंमत काय आहे ? हे आपल्याला कळत नाही; पण तो घेतल्याविना चालत नाही. त्याचप्रमाणे जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरावा लागतो. त्या भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल, त्याच वेळी आपल्याला कळेल.’

२. देवाला ओळखणे सोपे नाही ! : देवाने श्रीखंड्या ब्राह्मणाच्या रूपात प्रत्यक्ष येऊन रात्रंदिवस संत एकनाथांची सेवा केली, तरी संत एकनाथ श्रीखंड्याला ओळखू शकले नाहीत, तर सामान्य मनुष्य त्याच्या हृदयात वसणार्‍या देवास कसा ओळखू शकेल ?

(सनातनचा ग्रंथ : सुगम भक्तीयोग)

भक्तीमार्गातील टप्पे !

१. शोकभावनेतून म्हणजेच दु:खातून भक्तीला आरंभ होतो.

२. पुष्कळ कष्ट करतो; पण यश-संपत्ती मिळत नाही, त्याचे दुःख होते. दुसर्‍याच्या साहाय्याची अपेक्षा असते. ‘ईश्वर समर्थ आणि मी अपूर्ण आहे’, ही भावना असते.

३. ‘ईश्वर शक्तीशाली आहे’, याची जाणीव होते आणि दृष्टी त्याच्याकडे असते.

(सनातनचा ग्रंथ : सुगम भक्तीयोग)

प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करत आहे, तसेच ईश्वराचे कार्यही माझेच आहे, या प्रकारचा भाव आणि त्यातून ईश्वरेच्छेने घडणार्‍या कृतीला ‘समष्टी भाव’ म्हणतात. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘भावजागृतीसाठी साधना : खंड १’)