आदर्श भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपी !
‘गोपी म्हणजे सूक्ष्म-देहाने कृष्णतत्त्वाशी पूर्णतः एकरूप झाल्याचे एकमेव उदाहरण होय. दिवसभरातील सर्व क्रियाकलाप, आचारादी सर्व ईश्वरार्पित बुद्धीने, म्हणजे ‘त्याच्यासाठीच, त्याच्या प्रीतीसाठीच करतो’, अशी बुद्धी, भावना असणे आणि त्याचे विस्मरण झाले असता अत्यंत व्याकुळ किंवा दुःखी होणे, हे भक्तीचे एक द्योतक आहे. ज्ञानोत्तर भक्ती करणार्या भक्ताच्या अंतःकरणाची अवस्था अशीच असते. ‘भक्ती ही परम प्रेमस्वरूप असावी’, असे भक्तीचे स्वरूप सांगून नारद सांगतात – भक्ती ‘यथा व्रजगोपिकानाम् ।’ (नारदभक्तिसूत्र, अध्याय २, सूत्र २१), म्हणजे ‘गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी.’ व्रजगोपिकांची कृष्णावरील भक्ती ‘अव्यभिचारिणी’ होती.
कृष्णाच्या स्मरणात त्या तल्लीन असत; किंबहुना देशकालच नव्हे, तर स्वतःचे देहभानही त्या विसरून जात असत. आदर्श भक्ती म्हणजे ‘गोपींच्या भक्तीसारखी’ एवढीच उपमा दिली जाते; कारण भक्तीचे वर्णन होऊ शकत नाही. ती शब्दांकित होऊ शकत नाही; कारण ती अर्थांकित आहे; म्हणून ‘भक्ती कशी असावी, तर गोपींसारखी’, हे त्याचे उत्तर असते. प्रत्यक्ष गोपींना विचारले, तरी त्या एखाद्या भक्ताचे नाव सांगून ‘त्याच्यासारखी’ एवढेच सांगणार; कारण भक्ती म्हणजे प्रेम. प्रेमाचे वर्णन होऊ शकत नाही; म्हणूनच तिला ‘अनिर्वचनीय’ असे म्हणतात. भक्ती म्हणजेच आपला आत्मा !
– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |