पुणे येथे परिवहन विभागाच्या अधिकार्याच्या गाडीची दुचाकीला धडक !
घायाळ झालेल्यांना उपचारांचा खर्च देण्याचे आमीष दाखवून दोषी अधिकार्याने हात झटकले !
पुणे – येथील हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी परिसरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या संभाजी गावडे या वरिष्ठ अधिकार्याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीला धडक दिली. निखिल पवार आणि विकास राठोड अशी अपघातात घायाळ झालेल्या २ तरुणांची नावे आहेत. संभाजी गावडे यांनी दोन्ही घायाळांच्या नातेवाइकांना उपचारांचा खर्च देण्याचे आमीष दाखवून अपघाताचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद होऊ दिला नव्हता; मात्र दोन्ही रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा खर्च देण्यास त्यांनी ऐनवेळी हात वर केल्याने दोन्ही रुग्णांना उपचार संपल्यावरही मागील ३ दिवसांपासून रुग्णालयातच रहावे लागले. हा अपघात ३ जुलै या दिवशी झाला. त्यानंतर अद्यापही कारवाई न झाल्याने अपघातात घायाळ झालेल्यांकडून संताप व्यक्त होत आहे.