साधकांमधील तीव्र अहंभावाचे रूपांतर भक्तीभावात करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘भक्त म्हणजे काय ?’, हे सांगणे

‘वर्ष १९९३ मध्ये मी एका सेवेनिमित्त मुंबई येथील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासस्थानी थांबलो होतो. तेव्हा तेथे एका संप्रदायाचे लोक आले होते. मी परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना सांगितले, ‘‘पांडुरंगाचे काही भक्त तुम्हाला भेटायला आले आहेत.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘भक्त म्हणजे काय ?’, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? कुणालाही ‘भक्त’ कसे म्हणता ? जो विभक्त नाही, त्याला ‘भक्त’, असे म्हणतात. भक्त प्रल्हाद आणि भक्त पुंडलिक ही भक्तांची आदर्श उदाहरणे आहेत.’’

२. व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात स्वतः एक अहंभावी व्यक्ती असल्याची जाणीव परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने होणे

पू. शिवाजी वटकर

वरील प्रसंगातून माझ्या लक्षात आले, ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अभ्यासवर्गाला जातो. मी नामस्मरण करतो. मला प.पू. भक्तराज महाराज यांचा सत्संग मिळतो. मी कर्मकांड करतो, म्हणजे मी एक भक्त आहे’, असे मला वाटायचे; परंतु वरील प्रसंगावरून ‘भक्त म्हणजे काय ? आणि भक्त होण्यासाठी भक्तीभाव वाढवला पाहिजे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला शिकवले. माझ्यामध्ये भाव होता; परंतु तो अहंशी जोडलेला होता, म्हणजे मी एक अहंभावी व्यक्ती होतो. मी एका मोठ्या आस्थापनात मोठ्या पदावर नोकरी करत होतो. माझी आर्थिक परिस्थिती चांगली होती. मला मान-सन्मानही मिळत होता. ‘मी व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात प्रचंड अहंभावी व्यक्ती आहे’, याची जाणीव मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने झाली, नाहीतर मी सहस्रो जन्म अहंभाव अन् त्याचे परिणामस्वरूप म्हणून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमध्ये अडकलो असतो. याविषयी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) त्यांच्या भजनातून सांगतात,

राग द्वेष संगे राहे । संशयाने दृष्टी पाहे ।
कल्पनेचे मंथन चाले । स्थिरावेना माझी वृत्ती ।। १ ।।

म्हणतसे मी माझे नाही । अहंभाव जागृत राही ।
वासना न देई शांती । तृष्णेची ही होई वृष्टी ।। २ ।।

(संदर्भ : ‘संत भक्तराज महाराज विरचित भजनामृत’)

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अहंभाव न्यून होऊन भक्तीभाव वाढणे

वर्ष १९८९ मध्ये माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मनुष्याचा जन्म प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि मोक्षप्राप्ती करणे’, यांसाठी झाला आहे अन् त्यासाठी ‘साधना करणे’, हा एकच उपाय आहे.’’ मी त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेली गुरुकृपायोगानुसार साधना अन् सेवा चालू केली. तेव्हा माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला आरंभ झाला. माझ्या मनाला वाटणारा मोठेपणा, अस्वस्थता, काळजी, भीती आणि असुरक्षितता निघून गेली. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला टप्प्याटप्प्याने भक्तीभाव शिकवून माझ्याकडून साधना करून घेतली.

त्यांच्या कृपेने वर्ष २००८ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के होऊन मी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालो. त्यानंतर माझ्यातील अहंभावामुळे वर्ष २०१० मध्ये साधनेत माझी घसरण झाली आणि माझी आध्यात्मिक पातळी ११ टक्के न्यून झाली. परात्पर गुरु डॉक्टरांनी पुन्हा माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेतले आणि त्यांच्याच कृपेने माझी आध्यात्मिक पातळी ७० दिवसांत ११ टक्के वाढली. त्यानंतर वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेला मला ‘संत’ म्हणून घोषित करण्यात आले. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यातील अहंभाव न्यून करून त्यांच्याशी असलेले अनुसंधान, म्हणजे त्यांच्या चरणांप्रतीचा भक्तीभाव वाढवल्यामुळे हे सर्व शक्य झाले. याविषयी प.पू. बाबा त्यांच्या भजनातून सांगतात,

भक्तांचा कैवारी । नांदे भक्तांघरी ।
भवभय हारी । नाम घेता ।। २ ।।

अनंता अनंत । लीला तुझी भारी ।
होई नामधारी । भक्ता काजा ।। ३ ।।

नाथा तुझ्या पायी । जैसा ज्याचा भाव ।
तैसा त्यासी ठाव । चरणी तुझ्या ।। ४ ।।

(संदर्भ : ‘संत भक्तराज महाराज विरचित भजनामृत’)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होण्यापूर्वी मी नियती, प्रारब्ध, देव इत्यादींवर श्रद्धा ठेवून जीवन जगत होतो; मात्र माझ्यातील अहंभावामुळे माझ्या जीवनात सतत उलथापालथ होऊन मी दुःखाच्या खाईत लोटला जायचो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला प.पू. भक्तराज महाराज यांचा स्थुलातून सत्संग मिळाला, तसेच मला प.पू. बाबांनी रचलेल्या, गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या भजनांचा छंद लागला. परिणामी माझा अहंभाव न्यून होऊन माझे परात्पर गुरु डॉक्टरांशी अनुसंधान वाढले. ज्याच्याशी आपले अनुसंधान साधले जाते, त्याच्यातील शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचा आपल्याला लाभ होतो अन् आपला भक्तीभाव वाढतो. ‘परात्पर गुरु डॉक्टर हे केवळ मोक्षगुरु नसून ते श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे महर्षींनी सांगितले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांशी होत असलेल्या अनुसंधानामुळे मला चैतन्यशक्ती मिळत आहे. ती चैतन्यशक्ती माझ्यातील भक्तीभाव वाढवत आहे.

४. साधकांनो, तुमची साधना चांगली होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या परिश्रमांविषयी कृतज्ञता म्हणून स्वतःतील भक्तीभाव वाढवा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासारख्या साधकांच्या साधनेसाठी सर्वस्वाचा त्याग करून सनातन संस्था स्थापन केली, सेवाकेंद्रे आणि आश्रम यांची निर्मिती केली, तसेच ग्रंथ अन् नियतकालिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशित केले आहेत. हे सर्व त्यांनी साधकांची साधना आणि भक्तीभाव वाढण्यासाठी केले आहे. साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांशी अनुसंधान, म्हणजेच त्यांच्या चरणी भक्तीभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. हेच सनातनच्या साधकांच्या जीवनाचे ध्येय आहे. याविषयी प.पू. बाबा त्यांच्या भजनातून सांगतात,

आवडो ते जिणे । वैराग्य हृदयी ।
नका माया मोही । गुंफू देवा ।। धृ. ।।

तुझी चरणसेवा । घडो नारायणा ।
अहंभावपणा । जळो देवा ।। १ ।।

(संदर्भ : ‘संत भक्तराज महाराज विरचित भजनामृत’)

५. कृतज्ञता

माझ्या मनावर भक्तीभावाचे महत्त्व बिंबवणारे आणि माझ्याकडून नामस्मरण, सेवा करवून अन् स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून घेऊन, तसेच माझ्यातील अहंभाव न्यून करून भक्तीभाव वाढवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. शेवटी म्हणावेसे वाटते,

पंचप्राणाच्या लावूनी वाती । पंचारती ही घेऊनी हाती ।।
भक्तीभोग हा लावियला । ओवाळितो मी आरतीला ।।’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.६.२०२४)