Crimes In Maharashtra : महाराष्ट्रात ३ लाख ७४ सहस्र ३८ गुन्ह्यांची नोंद !
देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर
मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – देशात एकूण ३५ लाख ६१ सहस्र ३७९ गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यांपैकी १०.२ टक्के गुन्हे केवळ महाराष्ट्रात नोंद झाले असून महाराष्ट्र देशातील गुन्हेगारीत दुसर्या क्रमांकावर आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी ठरले आहे’, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १२ जुलै या दिवशी विधान परिषदेत केला. या सरकारने केलेल्या सर्व घोषणा सर्वसामान्यांच्या हितासाठी नसून केवळ कंत्राटदारांच्या हितासाठी केल्या आहेत, अशा शब्दांत दानवे यांनी २६० अनव्ये प्रस्तावावर बोलतांना सरकारने केलेल्या विविध घोषणांवर टीका केली.
ते पुढे म्हणाले की, देशात महिलांवरील अत्याचारांचे ४ लाख ४५ सहस्र गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांपैकी ४५ सहस्र गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंद आहेत. आम्ल फेकण्याच्या घटना, सायबर गुन्हे यात महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहेत. एकीकडे सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आणली; मात्र प्रत्यक्षात महिलांचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे.
संपादकीय भूमिका‘जय जय महाराष्ट्र माझा !’ असे केवळ महाराष्ट्र गीत गाऊन उपयोग नाही, तर महाराष्ट्र खर्या अर्थाने समृद्ध राज्य होण्यासाठी कायद्याची कडक कार्यवाही होणेही आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते ! |