YS Jagan Mohan Reddy : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात हत्येचे प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

डावीकडून माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि रघुराम कृष्ण राजू

अमरावती – वाय.एस्.आर्. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासह २ आय.पी.एस्. अधिकार्‍यांवर हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सत्ताधारी टीडीपीचे आमदार रघुराम कृष्ण राजू यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.

१. आमदार रघुराम कृष्ण राजू यांना वर्ष २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. ‘माझ्यावर खोटा गुन्हा नोंदवून मला अटक करण्यात आली’, असे आमदार राजू यांनी म्हटले आहे. त्यांनी तक्रारीत पुढे म्हटले, ‘‘माझा कोठडीत अतोनात छळ करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सांगण्यावरून पोलीस अधिकारी पी.व्ही. सुनील कुमार यांच्यासह इतर काही पोलीस अधिकार्‍यांनी मला बेल्ट आणि काठ्या यांद्वारे मारहाण केली. मला हृदयाशी संबंधित आजार असतांनाही मला औषध घेण्याची अनुमती दिली नव्हती.’’

२.  आय.पी.एस् अधिकारी पी.व्ही. सुनील कुमार आणि पी.एस्.आर्. सीतारामनजनेयुलू, तसेच निवृत्त पोलीस अधिकारी आर्. विजय पॉल आणि जी. प्रभावती यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

असे गुंड प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी एका राज्याचे मुख्यमंत्री बनतात, ही लोकशाहीची थट्टा !