भाजपचे ५, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी २, तर काँग्रेससह ठाकरे गटाचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी !

मुंबई – विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी १२ जुलै या दिवशी निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपचे ५, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे प्रत्येकी २, तर काँग्रेस अन् उद्धव ठाकरे गट यांचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार उभे होते. महाविकास आघाडीचे संख्याबळ अल्प असूनही त्यांनी १ अतिरिक्त उमेदवार उभा केला. महाविकास आघाडीकडून उभे असलेले शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा पराभव झाला.

विधानसभेच्या आमदारांची संख्या २७४ असल्यामुळे ११ आमदारांना विजयासाठी प्रत्येकी २३ मतांची संख्या निश्चित झाली होती. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत विजयी झाले. शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे ३७ आमदार होते; मात्र काँग्रेसचा एकच उमेदवार असल्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त मते होती. त्यामधील काही मते महायुतीच्या उमेदवारांना पडल्याचे विजयी उमेदवारांच्या संख्याबळावरून दिसून येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर पाठवण्यात आले, तसेच लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवर घेतले.