‘अग्निहोत्र संदेश पदयात्रे’स नगरमधून उत्साहात निरोप !
पदयात्रेचे बाविसावे वर्ष : ज्येष्ठांचा उल्लेखनीय सहभाग
नगर – राहुरी तालुक्यामधील टाकळीमिया येथील अग्निमंदिराच्या प्रांगणामधून निघालेल्या ‘अग्निहोत्र संदेश पदयात्रे’चे नगर शहरामधील शिल्पा गार्डनमध्ये उत्साहपूर्ण आणि भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. दुपारचा भोजनप्रसाद आणि विसावा घेऊन पदयात्रेने गुरुपौर्णिमेसाठी अक्कलकोटकडे प्रस्थान केले. पदयात्रेचे हे २२ वे वर्ष आहे. या पदयात्रेत नगर जिल्ह्यामधील अग्निहोत्री श्रद्धेने सहभागी होत आहेत.
संत ज्ञानेश्वरांनी नामसाधनेसाठी हरिपाठ सांगितला, तर गीतेवरील भाष्य करतांना नित्य यज्ञकर्म करण्याचाही संदेश दिला. संत एकनाथ, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यासह सर्व संतांनी यज्ञकर्माचा पुरस्कार केल्याचे संत वाङ्मयात दिसून येते. ‘हरे राम हरे कृष्ण…’ या नामस्मरणासमवेतच यज्ञसंस्कृतीचाही प्रचार करणारी, म्हणजेच हवनयुक्त नामस्मरणाचे वेगळेपण जपणारी ही अग्निहोत्र संदेश पदयात्रा आहे. परम सद्गुरु श्रीगजानन महाराजांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्निहोत्र करण्याचा संदेश या पदयात्रेमधून दिला जातो.
अग्निहोत्राचे लाभपदयात्रेत सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी नित्याप्रमाणे अग्निहोत्र केले जाते. ‘अग्निहोत्र कसे करावे ?’ याची शास्त्रशुद्ध माहिती देतांना सप्रात्यक्षिक मार्गदर्शनही गावोगोवी-खेडोपाडी-वाड्यावस्त्यांवर केले जाते. अग्निहोत्राने प्रसन्नता आणि समाधान लाभते. ताणतणाव दूर होतो. मनोबल वाढते. व्यसनमुक्त होण्यासाठी अग्निहोत्र उपयुक्त ठरते. वातावरण शुद्ध होते. अग्निहोत्रस्थानी कल्याणकारी चक्र कार्यरत राहते. अग्निहोत्राचा हा विधी अत्यंत साधा, सोपा आणि सुलभ असून ‘घरामध्ये तो नित्य कसा करावा ?’ हे या पदयात्रेत सांगितले जाते. पदयात्रा प्रमुख म्हणून डॉ. दिगंबरराव जाधव, विष्णुपंत कवाणे, रविंद्र गुंड, भागवत चोथे आणि डॉ. एस्.ए. शिंदे हे काम पहात आहेत. नगर शहरामधून प्रस्थान केलेली ही पदयात्रा वाळुंज, रूईछत्तीशी, मांदळी, माहिजळगांव, करमाळा, जेऊर, मोडनिंब, लांबोटी, सोलापूर मार्गे अक्कलकोट येथील शिवपुरीस २० जुलै २०२४ ला पोचेल. २१ जुलै २०२४ ला गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी होऊन परतीचा प्रवास चालू करेल. या पदयात्रेचे व्यवस्थापन गेल्या अनेक वर्र्षांपासून पहात असलेल्या श्रीमती शोभनाताई वाळिंबे यांच्यासह सर्वश्री ल.य. कुवळेकर, अमित वाळिंबे, मिलिंद चवंडके, दिलीप शहापूरकर, उमेश गट, डॉ. रोहित ढाकेफळकर, मंगेश लिमजे, सौ. ज्योती वाळिंबे, सौ. प्रमिलाताई मुथ्था, सौ. अलका मुंदडा, सौ. निर्मला होनराव आदी अग्निहोत्री परिवार आणि यज्ञप्रेमी नगर शहरामध्ये या पदयात्रेस निरोप देतांना उपस्थित होते. |