अनधिकृत मशिदीच्या बांधकामापासून विशाळगडाला मुक्ती द्यावी ! – आंदोलक

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली हिंदुत्वनिष्ठ आंदोलकांची भेट !

आंदोलकांशी चर्चा करतांना कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अनधिकृत पद्धतीने बांधण्यात येणार्‍या मशिदीच्या बांधकामाच्या विरोधात अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १२ जुलै या दिवशी आंदोलनस्थळी जाऊन हिंदुत्वनिष्ठ आंदोलकांची भेट घेतली, तसेच त्यांच्याशी चर्चा करून ‘त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्यात येईल’, असे आश्वासन दिले.

विशाळगडावर होणार्‍या अनधिकृत मशिदीच्या बांधकामाविरोधात हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी नागरिक विविध मार्गांनी विरोध दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांनी धरणे आंदोलन केले. या वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘विशाळगडाचे पावित्र्य जापण्यासाठी आंदोलन करणार्‍या सर्व आंदोलकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आंदोलकांनी मला जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची प्रत आणि निवेदन द्यावे. तुमच्या प्रतिनिधी मंडळासमवेत ते निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवतो. सामाजिक भान राखत विशाळगडावर होणार्‍या अनधिकृत बांधकामाविरोधात उभे राहिलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे.’’