‘इस्कॉन’च्या वतीने आज नगर शहरात रथयात्रा महामहोत्सव !

भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

नगर – ‘आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ’ (इस्कॉन) नगर यांच्या वतीने श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील कादंबरीनगरीत असलेल्या ‘इस्कॉन’च्या मंदिराच्या वतीने रथयात्रा काढण्याचे हे पाचवे वर्ष असून १३ जुलै २०२४ या दिवशी दुपारी १ वाजता येथील लालटाकी रोडवरील खाकीदास बाबा मठामधून रथयात्रेचा शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती येथील इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्री. गिरीवरधारी दास यांनी दिली, तसेच भाविकांनी रथयात्रा महामहोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अ. रथयात्रेच्या सांगता समारंभात खाकीदास बाबा मठातील मंदिराच्या सभामंडपात रामनिताई प्रभू (पुणे) यांचे सुश्राव्य प्रवचन, दीपदान, छप्पन भोग असे कार्यक्रम होणार आहेत. महाप्रसाद सोहळ्याने सांगता करण्यात येणार आहे. रथयात्रा महामहोत्सवात ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।’ या महामंत्राचे सवाद्य अखंड हरिनाम संकीर्तन असेल.

आ. संग्रामभैय्या जगताप, भैय्यासाहेब गंधे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत असलेल्या या सोहळ्यात इस्कॉनच्या पुणे मंदिराचे सर्वश्री रूपगोस्वामी प्रभू, रामनिताई प्रभू, रामसेवक प्रभू, मदनमनोहर प्रभू, पितांबर चैतन्य प्रभू सहभागी होणार आहेत.