सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तंतोतंत आज्ञापालन करणारे श्री. सुरेश कदम (वय ६० वर्षे) !

आषाढ शुक्ल सप्तमी (१३.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सुरेश कदम यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. सुरेश कदम यांना ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

श्री. सुरेश कदम

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अभ्यासवर्गात सांगितलेले सूत्र तत्काळ आचरणात आणणे

डॉ. दुर्गेश सामंत

‘सुरेशभाऊंना वाचनाची पुष्कळ आवड होती. ते नोकरी करत असतांना त्यांच्याकडे बरीच पुस्तके होती. त्यांत कादंबर्‍या आणि कथा, अशा प्रकारची पुस्तके होती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एका अभ्यासवर्गात सांगितले, ‘‘कादंबर्‍या इत्यादी वाचणे’, म्हणजे मनाची करमणूक ! त्यातून साधना होत नाही.’’ हे ऐकल्यानंतर नुकताच साधनेला आरंभ केलेल्या सुरेशभाऊंनी स्वतः व्यय करून जमा केलेला आवडीच्या पुस्तकांचा संग्रह आपल्या मित्राला देऊन टाकला.

२. ‘वाचनाचा स्वतःवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करणे

सुरेशभाऊ ‘वाचन करत असतांना त्या वाचनाचा स्वतःवर काय परिणाम होतो ?’, हेही पहातात. एका हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीचे एक वैचारिक पुस्तक त्यांनी वाचायला घेतले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ते पुस्तक वाचतांना त्यांचा नामजप बंद पडला आहे. त्यांनी लगेच ते पुस्तक वाचणे बंद केले.

३. ‘स्मार्टफोन’च्या वापरामुळे वेळ वाया जातो’, हे लक्षात येताच जुन्या प्रकारचा भ्रमणभाष वापरणे चालू करणे

सुरेशभाऊ जुन्या पद्धतीचा भ्रमणभाष वापरत होते. ते भ्रमणभाषचा वापर करू लागल्यानंतर काही काळानंतर ‘स्मार्टफोन’ बाजारात आले. त्यांच्या नातेवाइकाने त्यांना एक स्मार्टफोन घेऊन दिला. ‘स्मार्टफोनवर चलचित्रे बघणे’ इत्यादीमध्ये अधिक वेळ जातो’, हे सुरेशभाऊंच्या लक्षात आले. त्यांनी लगेच तो स्मार्टफोन आपल्या नातेवाइकाला दिला आणि ते पुन्हा आपला जुन्या प्रकारचा भ्रमणभाष वापरू लागले.’

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२४)