संपादकीय : नशेच्या गर्तेत त्रिपुरा !

प्रतिकात्मक छायाचित्र

त्रिपुरामध्ये ८०० हून अधिक विद्यार्थी ‘एच्.आय.व्ही.’ (एड्स) बाधित झाले आहेत, तर ४७ विद्यार्थ्यांचा एड्समुळे मृत्यू झाला आहे. एका राज्यामधील ही इतकी मोठी आकडेवारी निश्चितच भयावह, चिंताजनक आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. हे असे का झाले ? अमली पदार्थांच्या इंजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने या आकडेवारीत वाढ झाल्याचे समजते. ‘एच्.आय.व्ही.’बाधित विद्यार्थ्याने वापरलेली अमली पदार्थांच्या इंजेक्शनची सुई दुसर्‍या विद्यार्थ्याने वापरली, तर त्यालाही हा संसर्ग होतो. त्रिपुरातील २२० शाळा आणि २४ महाविद्यालये-विद्यापिठे यांमध्ये ‘एच्.आय.व्ही.’ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यावर हे उघड होते, हेच संतापजनक आहे. ४७ विद्यार्थ्यांचा मृत्यू होईपर्यंत सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? जेव्हा २ – ४ रुग्ण सापडले, तेव्हा वेळीच दक्षता का घेतली गेली नाही ? ही गोष्ट शालेय किंवा महाविद्यालयीन प्रशासन, आरोग्ययंत्रणा, शिक्षण विभाग यांच्यापैकी कुणाच्या निदर्शनास कशी आली नाही ? कि लक्षात येऊनही संबंधित यंत्रणांनी त्याकडे कानाडोळा केला ? या सर्वच प्रकरणाची समूळ चौकशीही व्हायला हवी ! यासाठी उत्तरदायी असणार्‍या सर्वांवरच कारवाई व्हायला हवी. आता ही समस्या भीषण झाली आहे. त्यामुळे तिचे निराकरण करणे सर्वांच्याच हाताबाहेरचे आहे. त्रिपुरामध्ये एड्सच्या रुग्णांमध्ये मागील १० वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

भारताला लागलेले गालबोट !

या प्रमाणात वाढ होण्याला इंजेक्शनची सुईच कारणीभूत आहे. या सुईचा वापर अधिकाधिक प्रमाणात कोण करते ? तर श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांकडूनच या सुईचा वापर केला जातो. ‘एड्स कंट्रोल सोसायटी’चे सहसंचालक सुभ्रजित भट्टाचार्जी यांनीही याला पुष्टी दिली आहे. श्रीमंत कुटुंबांमध्ये आई-वडिलांचे मुलांकडे लक्ष नसते. पैसा उडवण्याची संधी सातत्याने उपलब्ध होत असल्याने ही मुले अशा मार्गांकडे वळतात आणि स्वतःच्या आयुष्याची हानी करून घेतात. आपली मुले काय करत आहेत, याकडे पालकांचेही लक्ष नसते. जेव्हा डोक्यावरून पाणी जाते, तेव्हा ही पालक मंडळी जागी होतात; पण सरतेशेवटी हातावर हात ठेवून आपल्या मुलांचा होणारा विध्वंस उघड्या डोळ्यांनी पहाण्याविना त्यांच्याकडे पर्यायच नसतो. ही मुले अमली पदार्थांच्या आहारी जाऊच नयेत, यासाठी प्रथमपासून प्रयत्न व्हायला हवेत. अमली पदार्थांच्या आधीन झाल्यावर त्यातून त्यांना मुक्त करणे, अमली पदार्थ घेण्यापासून परावृत्त करणे हे महाकठीण होते. ‘श्रीमंतांना सर्व गोष्टी माफ असतात’, असे म्हटले जाते; पण याचाच अपलाभ घेतला जाऊन त्याचा परिणाम राज्यावर आणि पर्यायाने देशावरही होतो. सर्वांचीच अपरिमित हानी होते.

इतके दिवस कुणी ‘एच्.आय.व्ही.’बाधित आढळले की, लगेच त्याविषयी कुजबूज होत असे किंवा ती एक धक्कादायक घटना म्हणून बघितली जात असे; पण आता त्रिपुराचे वृत्त पाहिले, तर ‘जणू काही तेथे ‘एच्.आय.व्ही.’बाधित ही सर्वसामान्य गोष्टच झाली आहे कि काय ?’, असा प्रश्न पडतो. तेथील ‘एच्.आय.व्ही.’ बाधितांच्या आकडेवारीने देशात उच्चांक गाठला आहे. स्वातंत्र्याची ७६ वर्षे आणि आता १ महिन्यानंतर ७७ वे वर्षे साजरे करणार्‍या भारतासाठी ही घटना लाजिरवाणीच आहे. सर्वाधिक ‘एच्.आय.व्ही.’बाधित झालेले त्रिपुरा राज्य म्हणजे विकासाच्या दिशेने जाणार्‍या भारताला लागलेले गालबोटच आहे. भावी पिढी ‘एच्.आय.व्ही.’बाधित होणे म्हणजे त्रिपुरा राज्याला लागलेली ही कीडच होय. अशाने त्रिपुरा राज्य रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही.

राष्ट्रोत्कर्ष साधला जावा !

त्रिपुरामधील भावी पिढी नशेच्या गर्तेत लोटली जात आहे. तिला कोणतेच ताळतंत्र राहिलेले नाही. उच्च शिक्षणाच्या नावाखाली त्रिपुरामधील विद्यापिठांमध्ये प्रवेश घ्यायचा आणि नशेच्या आहारी जाऊन स्वतःसह अन्य विद्यार्थ्यांचे भवितव्यही नष्ट करायचे, असे प्रकार येथे होत आहेत. श्रीमंत पालक मुलांच्या सर्व गरजा पुरवतात आणि त्यांचे लाड करतात, याचाच हा परिणाम असल्याचे तेथील आधुनिक वैद्यांचे म्हणणे आहे. अनेक समाजधुरिणांनीही अमली पदार्थांच्या आहारी न जाण्याचे आवाहन मुलांना केले आहे; पण त्यांचे ऐकतो कोण ? हातात पैसा आला आणि नैतिकतेचा पाया नसला की, उद्दामपणा वाढतो. असाच प्रकार त्रिपुरात झाला आहे. आई-वडिलांचा बक्कळ पैसा अशा प्रकारे नशेखोरीत उडवायचा, यातच त्यांना श्रेष्ठत्व वाटते. ‘असे करणे म्हणजेच जीवनाचा उपभोग घेणे होय’, असे सध्याच्या पिढीला वाटते; कारण त्यांच्या समोर आज योग्य आदर्शच नाही. ही मुले आदर्श घेतात, तो कुणाचा ? तर व्यसनांच्या आहारी जाणार्‍या अभिनेत्यांचा ! बहुतांश चित्रपटांमध्ये अमली पदार्थ, व्यसने, नशा यांच्याविषयीच्या दृश्यांचा भडीमार केलेला असतो. ‘असे करणे हेच खरे जीवन आहे’, हे त्या दृश्यांमधून दाखवण्याचा नव्हे नव्हे, माथी मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. साहजिकच सध्याची मुले त्याप्रमाणे अनुकरण करतात; पण वास्तव जीवनात हे सर्व किती धोकादायक आणि जीवघेणे आहे, याची त्यांना कल्पना नसते. जेव्हा एखाद्याचा जीव जातो, त्यानंतर सर्वजण खडबडून जागे होतात; पण तोवर वेळ निघून गेलेली असते. मृत्यू स्वीकारण्याविना गत्यंतर नसते. तरुण पिढीची होणारी ही दुर्दशा वेळीच रोखायला हवी ! तरुण पिढी राष्ट्रभक्त, क्रांतीकारक, महापुरुष, लढवय्ये वीर यांचा आदर्श घेईल, यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करायला हवेत. हे आदर्श समोर असतील, तर तरुण पिढी रसातळाला जाणार नाही, उलट ती प्रगतीपथाच्या दिशेने वाटचाल करून राष्ट्रोत्कर्ष साधेल, हे निश्चित ! अशी पिढी विकासात भरारी घेणार्‍या भारताला अपेक्षित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधतात. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात. तरुण पिढी तणावमुक्त रहावी आणि तिने भारताच्या विकासात योगदान द्यावे, हा त्यांचा यामागील हेतू आहे. तो काही प्रमाणात साध्य होत असला, तरी त्रिपुरासारख्या घटना देशासाठी कलंक ठरतात. कोणतेही राज्य असो वा देश, त्याची सर्वांगीण प्रगती नागरिकांच्या आरोग्यावर अवलंबून असते. त्रिपुरा येथील घटनेमुळे तेथील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचेच उघड होते. त्रिपुरात घडणार्‍या संवेदनशील विषयात केंद्र सरकारने लक्ष घालावे. त्रिपुराची पुनरावृत्ती न होता निरोगी भविष्य घडावे, तसेच देशभरातील युवा पिढी नशेच्या गर्तेत न जाता राष्ट्रकार्यात सक्रीय व्हावी, यासाठी सरकारने पावले उचलणे काळाच्या दृष्टीने अपरिहार्य आहे !

चित्रपटातील व्यसनाधीन दृश्यांच्या भडीमारामुळे त्याचे अनुकरण करणारी तरुण पिढी निपजणे, हे देशासाठी धोकादायक !