दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : माटुंगा स्थानकाजवळ रुळाला तडा !; लाभाचे आमीष दाखवून महिलेची फसवणूक !…
माटुंगा स्थानकाजवळ रुळाला तडा !
मुंबई – माटुंगा स्थानकाजवळ रेल्वेरुळाला तडा गेल्याने येणार्या-जाणार्या दोन्ही दिशांकडील लोकल सेवा खोळंबली. प्रवाशांना २० ते ३० मिनिटे लोकल उपलब्ध न झाल्याने त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
लाभाचे आमीष दाखवून महिलेची फसवणूक !
पनवेल – खारघरमधील एका महिलेला ऑनलाईन संपर्क करून ‘शेअर बाजारात रक्कम लावल्यास अधिकचा लाभांश मिळेल’, असे आमीष दाखवून ४ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी महिलेने तक्रार केली आहे. नवी मुंबई सायबर सेलचे पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका : अशा आमिषांना न भूलण्यासाठी नागरिकांनी सतर्कता वाढवावी !
आयफोन न दिल्याने मुलाची आत्महत्या
तरुणांमधील संयम नष्ट झाल्याचे दर्शवणारी घटना !
पनवेल – कामोठे येथील किशोर (वय १८ वर्षे) याने वडिलांनी दीड लाख रुपयांचा आयफोन न दिल्याने गळफास लावून आत्महत्या केली. मागील काही दिवसांपासून तो सातत्याने वडिलांकडे आयफोनची मागणी करत होता.
शाळेतून काढण्याच्या भीतीपोटी विद्यार्थ्याची आत्महत्या !
कल्याण – येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्याने आत्महत्या केली. संबंधित विद्यार्थी आणि त्याचे २ मित्र यांनी सामाजिक माध्यमावर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केली होती. या प्रकरणी शाळेने तिघांवर कारवाई केली होती. शाळेतून काढले जाईल, याचा धसका घेऊन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या संचालकावर गुन्हा नोंदवला आहे.
श्वान आणि मांजर यांच्या संदर्भातील तक्रारींसाठी ॲप
मुंबई – मुंबई महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाने श्वान आणि मांजर यांच्या संदर्भातील तक्रारींसाठी ॲप सिद्ध केले आहे. श्वान चावणे, श्वानांची संख्या वाढणे, भटके श्वान-मांजरींचा उपद्रव, लसीकरण, त्यांची नसबंदी याविषयीच्या तक्रारी आणि विनंती ॲपवर करता येईल. आतापर्यंत यावर ४० तक्रारी करण्यात आल्या आहेत. पशूवैद्यकीय आरोग्य विभाग (VHD) असे त्याचे नाव असून महापालिकेच्या संकेतस्थळावरून या ॲपवर जाता येते.