सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या कालावधीमध्ये भावस्थिती अनुभवणार्या मंगळुरू येथील आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे !
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या कालावधीमध्ये सौ. मधुवंती पिंगळे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधिकेला ‘आज आश्रमात असायला हवे होते’, हा तिचा विचार ‘व्यष्टी विचार’असल्याची सूक्ष्मातून जाणीव करून देणे आणि ‘प्रत्येक साधकाचे घर आश्रम व्हायला हवा’, हा गुरुदेवांच्या व्यापक विचार आठवून मन आनंदी होणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींच्या आज्ञेनुसार २७.५.२०२४ या दिवशी हृदयमंदिरात गुरुदेवांची मानसपूजा करायची होती. मी त्या दिवशी निजामाबाद (तेलंगणा) येथे एका साधिकेच्या घरी निवासाला होते. सकाळी उठल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘मी आज आश्रमामध्ये असते, तर बरे झाले असते.’ त्याचवेळी ‘गुरुदेव सर्वव्यापी असून मी त्यांना कोठेही अनुभवू शकणार आहे आणि मला त्यांना हृदयमंदिरात अनुभवायचे आहे’, असा विचार माझ्या मनात गुरुदेवांच्या कृपेने आला. त्यानंतर लगेच गुरुदेवांनी मला ‘माझा आधीचा विचार हा व्यष्टी विचार’ असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर ‘आपल्या प्रत्येक साधकाचे घर, म्हणजे रामनाथी आश्रम व्हायला हवा’, या त्यांच्या व्यापक शिकवणीचे मला स्मरण होऊन माझे मन पुष्कळ आनंदी झाले.
२. एका साधिकेच्या घरी गुरुदेवांची भावपूर्ण पूजा केल्यावर वातावरण चैतन्यमय होणे
त्यानंतर ‘आहे त्या ठिकाणीच गुरुदेवांचा जन्मोत्सव सर्व साधकांच्या समवेत कसा साजरा करू शकतो ?’, याविषयी माझी विचारप्रक्रिया चालू झाली. त्यानंतर सर्वांनी मिळून स्वच्छता आणि गुरुदेवांच्या आगमनाची भावपूर्ण सिद्धता (तयारी) केली. त्या साधिकेने पूर्वनियोजन न करताही भावपूर्ण सिद्धता करून गुरुदेवांच्या छायाचित्राची भावपूर्ण पूजा केली. दिवसभरही ‘साधिकेच्या घरामधील वातावरण आदल्या दिवशीच्या तुलनेत अधिक चैतन्यदायी झाले आहे’, असे आम्हाला अनुभवता आले. अशा प्रकारे आम्हाला गुरुदेवांची कृपा अनुभवता आली.
३. गुरुदेवांची मानसपूजा करण्यासाठी सर्व इंद्रियांची मानस बैठक घेणे
२७.५.२०२४ या दिवशी मला गुरुदेवांची मानसपूजा करायची होती. त्यासाठी सकाळी मी गुरुदेवांनी सुचवल्याप्रमाणे सर्व इंद्रियांची मानस बैठक घेतली. बैठकीमध्ये ‘गुरुदेवांचा जन्मोत्सव हृदयमंदिरामध्ये साजरा करायचा आहे, तर तो कसा करूया ?’, याचे नियोजन सर्व इंद्रियांनी मिळून केले.
३ अ. मानसपूजेसाठी इंद्रियांनी केलेले नियोजन
३ अ १. मन : मन म्हणाले, ‘मी गुरुदेवांचे सिंहासन बनतो.’ त्या वेळी सर्व इंद्रियांनी त्याला सांगितले, ‘तू सातत्याने इकडे-तिकडे भटकत आणि विषयांमधे गुंतत असतोस. तुला गुरुदेवांचे सिंहासन बनायचे असेल, तर आतापासून तुला गुरुदेवांच्या अनुसंधानात रहावे लागेल. मन त्यासाठी सिद्ध झाले आणि म्हणाले, ‘मी गुरुदेवांच्या अनुसंधानामधे सतत रहाण्याचा प्रयत्न करतो.’
३ अ २. बुद्धी आणि अहंकार : त्यानंतर बुद्धी आणि अहंकार यांनी सांगितले, ‘आम्ही गुरुदेवांचे दास बनतो. गुरुदेव जेव्हा सिंहासनावर विराजमान होतील, तेव्हा आम्ही गुरुदेवांच्या बाजूला उभे राहू.’ सर्व इंद्रियांनी त्यांना सांगितले, ‘यासाठी तुम्हाला गुरुदेवांना शरण जावे लागेल, तरच तुम्हाला ही संधी मिळू शकते.’ ते दोघेही यासाठी सिद्ध झाले.
३ अ ३. शरिरातील पेशी : शरिरातील काही पेशींनी ‘आम्ही गुरुदेवांच्या सिंहासनासमोरील रांगोळी बनतो’, काही पेशींनी ‘आम्ही हृदयमंदिराचे तोरण बनतो’, तर काहींनी ‘आम्ही पणत्या बनतो’, असे सांगितले.
अशा पद्धतीने सर्व इंद्रियांनी मिळून जन्मोत्सवाचे नियोजन केले आणि सर्वजण गुरुदेवांच्या आगमनाची प्रतीक्षा करू लागले.
३ आ. इंद्रियांची बैठक घेत असतांना भावजागृती होऊन सर्व इंद्रिये गुरुमय झाल्याचे अनुभवता आले.
३ इ. मानसपूजा करतांना आलेल्या अनुभूती
१. त्यानंतर मी प्रत्यक्ष मानसपूजा करण्यासाठी बसले, त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले. ‘माझे हृदयमंदिर प्रकाशमान झाले आहे. सर्व इंद्रियांनी मिळून त्यामध्ये पणत्या लावल्या होत्या. मन सिंहासन बनले होते. त्यावर ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव’ असे सोनेरी अक्षरांनी लिहिले होते. मन सतत अनुसंधानाच्या स्थितीत होते.
२. अहं आणि बुद्धी अत्यंत शरणागत अवस्थेत दोन्ही बाजूला उभे होते. सर्व इंद्रिये गुरुदेवांची आतुरतेने वाट पहात होती. त्यानंतर ‘गुरुदेवांचे आगमन होत आहे’, असे दिसले. पांढराशुभ्र पोशाख परिधान करून गुरुदेव हृदयमंदिरामध्ये प्रवेश करत होते. त्या वेळी सर्व इंद्रिये आणि पेशी यांनी ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव’ असा भावपूर्ण जयघोष चालू केला.
३. गुरुदेव अत्यंत वात्सल्यभावाने आणि मधुर स्मित करत सर्वांकडे पहात होते. त्यांनी हृदयमंदिरात प्रवेश केला आणि ते मनाच्या सिंहासनावर विराजमान झाले. बुद्धी अन् अहं अत्यंत शरणागतभावाने बाजूला उभे होते. हळूहळू ते गुरुदेवांच्या चरणांखाली गेले. सर्व इंद्रियांनी मिळून गुरुदेवांच्या मानसपूजेची परिपूर्ण सिद्धता केली होती.
४. त्यानंतर मी गुरुदेवांच्या मानसपूजेला आरंभ केला. काही वेळाने माझे स्वतःचे आणि आजूबाजूचे अस्तित्व विसरून मला कशाचेच भान राहिले नाही. मला ही अवस्था काही वेळ अनुभवता आली. त्यानंतर सहसाधकांनी मला हाक मारली. तेव्हा मला ‘ध्यानातून जाग आली’, असे जाणवले.
४. तिरूपती बालाजीचा प्रसाद मिळाल्यावर ‘साक्षात् भगवान श्रीविष्णूनेच हा प्रसाद पाठवला आहे’, असे वाटून भावजागृती होणे
त्याच दिवशी दुपारी म्हणजे २७.५.२०२४ या दिवशी त्या साधिकेच्या परिचितांनी तिरुपती बालाजीचा प्रसाद आणून दिला. तो प्रसाद मिळाल्यावर ‘साक्षात् भगवान श्रीविष्णूनेच हा प्रसाद पाठवला’, या विचाराने माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘गुरुदेव सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि अंतर्यामी आहेत’, याचीच प्रचीती त्यांनी मला दिली.
‘गुरुदेवांच्याच कृपेमुळेच त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आणि ही भावस्थिती त्यांच्याच कृपेमुळे अनुभवता आली’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक.(२.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |