शांत, हसतमुख आणि देवाची ओढ असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड (पुणे) येथील चि. मल्हार जयेश बोरसे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मल्हार बोरसे हा एक आहे !

चि. मल्हार बोरसे
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

१ अ. गुरुकृपेमुळेच गर्भ सुरक्षित रहाणे : ‘मला गर्भधारणा झाली आहे’, हे २ मास मला कळले नाही. तोपर्यंत मी ‘स्वरक्षण प्रशिक्षण करणे आणि जड वस्तू उचलणे’ इत्यादी सर्व केले. केवळ गुरुकृपेमुळेच गर्भ सुरक्षित राहिला.

१ आ. गर्भधारणा झाल्याचे समजल्यावर आनंद होणे आणि काळजीही वाटणे अन् यजमानांशी बोलल्यावर मन सकारात्मक होणे : दोन मासांनी गर्भधारणा झाल्याचे समजल्यावर मला आनंद झाला. त्याच वेळी ‘आता आपत्काळ आहे. कसे होणार ?’, असा विचार माझ्या मनात आला. याविषयी मी यजमानांशी बोलले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘भगवान श्रीकृष्णही किती संकटातून जन्माला आला ! ही सर्व देवाचीच लीला आहे.’’ त्या वेळी माझे मन सकारात्मक झाले आणि नंतर हा विचार मनात कधीच आला नाही.

१ इ. पोटावर निळा प्रकाश दिसणे आणि त्याकडे बघत रहावेसे वाटणे : तिसर्‍या मासात एकदा मला माझ्या पोटावर निळा प्रकाश दिसला. ‘खिडकीत काहीतरी असेल. त्याचा प्रकाश असेल’, असे मला वाटले; पण बघितले, तर तिथे काहीच नव्हते. तो प्रकाश पोटावर बराच वेळ टिकून होता आणि ‘त्याकडे बघत रहावे’, असे मला वाटत होते.

सौ. माधवी बोरसे

१ ई. आधुनिक वैद्यांनी ‘तुम्ही आनंदी दिसत आहात’, असे सांगणे आणि त्या वेळी प.पू. गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत होणे : पाचव्या मासात मी सोनोग्राफी (टीप) करायला गेल्यावर आधुनिक वैद्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही किती आनंदी दिसत आहात ! तुमच्या शरिराला सुगंध येत आहे. मलाही वैद्यकीय व्यवसायाचा कंटाळा आला आहे. ‘हे सर्व (व्यवसाय) सोडून देऊन साधना करून आनंदी रहावे’, असे मला वाटत आहे.’’ त्यानंतर मी त्यांना गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली आणि म्हणाले, ‘‘आपण करत असलेला व्यवसाय ‘साधना’ म्हणून केला, तरी आनंद मिळेल’’ तेव्हा ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला हा आनंद मिळत आहे’, असे जाणवून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

टीप – सोनोग्राफी : विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी.

१ उ. श्रीरामाचा पाळणा चालू झाल्यावर पोटातील गर्भाची हालचाल थांबणे आणि ‘बाळ शांततेने पाळणा ऐकत आहे’, असे वाटणे : आठवा मास चालू असतांना श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीरामजन्मापूर्वी अर्धा घंटा मी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप करत होते. नामजप करतांना पोटातील गर्भाची पुष्कळ हालचाल होत होती. रामजन्म झाल्यावर पाळणा म्हणायला आरंभ केल्यावर गर्भाच्या हालचाली थांबल्या. त्या वेळी ‘बाळ शांततेने पाळणा ऐकत आहे आणि पाळणा भावपूर्ण अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते.’

– सौ. माधवी जयेश बोरसे (चि. मल्हार याची आई), चिंचवड, पुणे.

१ ऊ. ‘प.पू. गुरुमाऊलींच्या खोलीत पाळणा हलत असून त्यात श्रीकृष्ण बसला आहे’, असे स्वप्नात दिसणे : ‘माझी सून (सौ. माधवी बोरसे) गर्भवती असतांना गोकुळाष्टमीच्या दिवशी एक महिला मला म्हणाली, ‘‘तुमच्या घरी श्रीकृष्ण येणार आहे.’’ त्यानंतर बर्‍याच वेळा ‘प.पू. गुरुमाऊलींच्या खोलीत पाळणा हलत असून त्यात श्रीकृष्ण बसला आहे’, असे मला स्वप्नात दिसायचे. जणू ‘श्रीकृष्णच जन्माला येणार आहे’, ही चाहूल माझ्या मनाला लागली होती.’ – श्रीमती जयश्री बोरसे (चि. मल्हार याची आजी (वडिलांची आई)), धुळे

२. प्रसुती

२ अ. साधिकेला भगवान श्रीकृष्ण सूक्ष्मातून तिच्या दिशेने येतांना दिसणे, त्या वेळी बाळाचा जन्म होणे आणि ‘श्रीकृष्णच आला आहे’, असे वाटून भावजागृती होणे : ‘प्रसुतीच्या वेळी मला शस्त्रकर्मगृहात नेले. तेव्हा तेथे ‘भगवान श्रीकृष्ण माझ्या दिशेने येत आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. त्या वेळी मला समुद्राच्या पाण्याचा सूक्ष्म नाद ऐकू येत होता. हे सर्व अनुभवतांना मला आनंद होत होता. तेव्हाच आधुनिक वैद्यांनी मला मुलगा झाल्याचे सांगितले. त्या वेळी ‘भगवान श्रीकृष्णच आला आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली.’ – सौ. माधवी जयेश बोरसे

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते ३ मास

३ अ १. ‘बाळाच्या जन्माच्या वेळी मी आणि माझी मुलगी (चि. मल्हारची आई) रुग्णालयात रहात असलेला कक्ष रुग्णालयातील अन्य कक्षांच्या तुलनेत चैतन्यमय झाला होता.

३ अ २. चि. मल्हार याचा चेहरा पुष्कळ तेजस्वी दिसत होता.’

– सौ. महानंदा चोरे (चि. मल्हारची आजी (आईची आई)), अमरावती

३ अ ३. बाळाच्या हाताची मुद्रा पाहून नामजप आपोआप चालू होणे : ‘बाळाच्या जन्मानंतर त्याच्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांची टोके एकमेकांना जुळलेली होती. अजूनही बर्‍याच वेळा मल्हारची ही मुद्रा बघायला मिळते. त्या वेळी ‘तो आम्हाला नामजप करायला सांगत आहे’, असे वाटून माझा नामजप आपोआप चालू होतो.

३ अ ४. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे पायांची मुद्रा करणे : ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाची पायांची मुद्रा असते (एक पाय दुसर्‍या पायावर असतो), त्याप्रमाणे मल्हारच्या पायांची मुद्रा होत असे. मल्हारचा जन्म झाल्यानंतर जवळपास ४ मासांपर्यंत त्यांच्या पायांची अशीच मुद्रा होत असे. त्याला उभे केले, तरी तो त्याच स्थितीत उभा रहायचा.

३ आ. वय ३ ते ६ मास

३ आ १. बाळाला कडेवर घेतल्यावर शरिरावर पाण्याचे शिंतोडे पडत असल्याचे जाणवणे आणि ‘अंगावर तीर्थ पडत आहे’, असे वाटून आनंद मिळणे : मल्हारला कडेवर घेतल्यानंतर ‘माझ्या शरिरावर पाण्याचे शिंतोडे पडत आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘माझ्या अंगावर तीर्थ पडत आहे’, असे जाणवून मला आनंद मिळत होता. त्या वेळी ‘असे नेमके का होत आहे ?’, हे मला कळत नव्हते. काही दिवसांनी मी एका सत्संगात ऐकले, ‘साधकांना त्यांच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे पडत असल्याचे जाणवणे’, ही अनुभूती आहे. त्या वेळी मला ‘देवानेच ही अनुभूती दिली’, याची जाणीव झाली आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’

– सौ. माधवी जयेश बोरसे

३ आ २. संतसहवासाची ओढ : ‘आमच्या घरी धुळे येथे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका आले होते. तेव्हा मल्हार ५ मासांचा होता. सद्गुरु काका आल्यानंतर तो लगेच झोपेतून उठून त्यांच्याकडे गेला. तो सद्गुरु काकांकडे एकटक पहात होता. तेव्हा सद्गुरु काका त्याला म्हणाले, ‘‘आपण याआधी भेटलो आहोत का ?’’ त्यानंतर मल्हार बराच वेळ त्यांच्याशी खेळत होता.

श्री. जयेश बोरसे

३ आ ३. सात्त्विक गोष्टींची आवड : मल्हारला दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहायला फार आवडतो. त्याला दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवल्यावर तो आनंदाने हात-पाय हालवायचा. तो दैनिक ‘सनातन प्रभात’कडे पाहून मोठ्याने आवाज करायचा. तो रडत असतांना त्याला दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवल्यावर तो लगेच शांत होत असे. तो १५ – २० मिनिटे दैनिकाकडे एकटक पहायचा आणि एकटाच दैनिकाशी खेळत रहायचा.’

– श्री. जयेश बोरसे (चि. मल्हारचे वडील), चिंचवड, पुणे.

३ इ. वय १ ते २ वर्षे

३ इ १. देवाची आवड : ‘तो घराबाहेर पडण्यापूर्वी हात जोडून देवाला प्रार्थना करतो. एखाद्या वेळी आम्ही प्रार्थना करायला विसरलो, तर तो आम्हाला प्रार्थना करण्याची आठवण करून देतो. मल्हारला ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय कसे करावेत ?’, हे दाखवल्यावर तो ‘मनोरा (‘टॉवर’) मुद्रा पद्धतीने आवरण काढणे, प्रार्थना करणे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे’, या कृती स्वतःहून करतो. त्याला झोपण्याच्या वेळी इतर गाणी किंवा गोष्टी सांगू लागल्यास तो लगेच ‘नाही’ म्हणतो. देवाच्या गोष्टी सांगितल्यावर तो लगेच प्रतिसाद देतो आणि झोपी जातो.

३ इ २. मल्हारला त्याच्या चुकीची जाणीव करून दिल्यावर तो लगेच स्वतःचे कान धरून क्षमा मागतो.

३ इ ३. मल्हारचा चेहरा प्रसन्न आणि हसरा आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर मला बर्‍याचदा प्रभु श्रीरामाची आठवण येते.’

– सौ. माधवी जयेश बोरसे

३ इ ४. ‘त्याची सर्वांशी लवकर जवळीक होते.

३ इ ५. त्याच्या जवळ बसल्यावर कधी कधी माझा नामजप आपोआप चालू होतो. माझे मन शांत आणि सकारात्मक होते.

३ इ ६. एखाद्या प्रसंगात माझे स्वभावदोष उफाळून आले असता मी मल्हारकडे पाहिल्यावर मला स्वतःच्या चुकीची जाणीव होते आणि माझ्याकडून चूक स्वीकारली जाते.

३ इ ७. मल्हारला पाहून ‘तुमच्याकडे श्रीकृष्ण आला आहे’, असे पू. (सौ.) संगीता पाटीलआजी यांनी सांगणे : आम्ही वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मल्हारने तेथे उपस्थित असलेल्या पू. (सौ.) संगीता पाटीलआजी (सनातनच्या ८५ व्या (समष्टी) संत, वय ६४ वर्षे) यांना भावपूर्ण नमस्कार केला. तेव्हा त्या मल्हारला म्हणाल्या, ‘‘तू कृष्ण आहे का ?’’ तेव्हा तो ‘हो’, असे म्हणाला. त्या वेळी पू. आजी २ वेळा मला म्हणाल्या, ‘‘तुमच्याकडे श्रीकृष्ण आला आहे.’’

– श्री. जयेश बोरसे

३ इ ८. ‘त्याचा स्वभाव शांत आहे. त्याच्याकडे बघितल्यावर मला आनंद मिळतो.’ – सौ. प्रिया घोंगडे (चि. मल्हारची मोठी मावशी), अमरावती

३ इ ९. मल्हारच्या सहवासात आनंद मिळणे : ‘त्याच्या समवेत खेळतांना मला आनंद वाटतो. मला त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. तो पुष्कळ प्रेमळ आहे. तो श्रीकृष्णाला ‘सखा’ म्हणतो. तो काहीही खाण्यापूर्वी प्रथम श्रीकृष्णाला देतो. आम्ही समवेत असलो की, एकत्र नामजपादी उपाय करतो. त्यामुळे मला त्याच्या समवेत रहायला आवडते.’ – कु. अन्वी अमोल वानखडे (मल्हारची मावस बहीण, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४ वर्षे), अमरावती

४. चि. मल्हारमधील स्वभावदोष : ‘हट्टीपणा आणि मनाप्रमाणे न झाल्यास चिडणे.

‘हे गुरुदेवा, ‘तुमच्या अपार कृपेमुळे मल्हारच्या माध्यमातून आम्हाला विविध दैवी अनुभूती घेता आल्या. हे लिखाणही केवळ तुम्हीच करून घेतले’, त्याबद्दल आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्री. जयेश आणि सौ. माधवी बोरसे, चिंचवड, पुणे. (१५.७.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.