सरकारचा निर्णय हिंदुत्वाला बळकटी देणारा ! – नितेश राणे, आमदार
दौंड उपविभागाचे उपअधीक्षक स्वप्नील जाधव स्थानांतर प्रकरण !
दौंड (जिल्हा पुणे) – दौंड उपविभागाचे उपअधीक्षक स्वप्नील जाधव हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. अप्रत्यक्षपणे ते जिहादींना साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याविषयी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांचे स्थानांतर करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य असून हिंदुत्वाला बळकटी देणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे उपअधीक्षक पाटील यांच्या कार्यपद्धतीविषयी आणि दौंड तालुक्यात वाढत असलेली गोहत्या, गोमांस विक्री आणि वाहतूक प्रकरणी तक्रारी आल्या होत्या. कुरकुंभ (ता. दौंड) एम्.आय.डी.सी.मध्ये (महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ) १ सहस्र २०० कोटी रुपयांचा ६०० किलो ‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. अशा अनेक तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. त्यांचा गांभीर्याने विचार करत ३ जुलै या दिवशी स्थानांतराचे आदेश काढण्यात आले. पाटील यांनी नवीन उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्याकडे पदभार सोपवला आहे.
संशयास्पद भूमिका !
केडगाव (ता. दौंड) येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’मधील २ मुलींचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद झालेला असतांना सर्व संबंधितांवर योग्य कारवाई केली नाही. पोलिसांनी अप्रत्यक्षपणे संस्थेला आणि संस्थाचालकांना पाठिशी घातले, असा आरोपही आमदार नितेश राणे यांनी विधानभवनामध्ये केला होता. (या प्रकरणातील संबंधितांची चौकशी करून कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)