प्रतिमहिन्याला सहस्रो लिटर भेसळयुक्त दुधाचे वितरण !

  • महाराष्ट्रात दुधातील भेसळ थांबणार कधी ?

  • केवळ होते दंडात्मक कारवाई !

दुधातील भेसळ

मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रात दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून प्रत्येक महिन्याला १० दूधकेंद्रांची पडताळणी करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. त्याचा अहवाल सरकारला सादर केला जातो. मागील वर्षभरात पडताळलेल्या १९६ नमुन्यांमध्ये २५ सहस्र ३३८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. ही भेसळ करणार्‍यांकडून १३ लाख ४४ सहस्र ४१० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही राज्यात दुधातील भेसळ थांबण्याचे नाव नाही. १० जुलै या दिवशी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला अन्न आणि औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेल्या उत्तरातून हा प्रकार उघड झाला आहे.

आमदार मुफ्ती महंमद इस्माईल अब्दुल खालिक यांनी नाशिकमध्ये होत असलेली अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्याविषयी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील दुधातील भेसळीचा प्रश्न उपस्थित केला. उत्तर देतांना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, ‘‘दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे २० जणांचे पथक राज्यात कार्यरत आहे. भेसळयुक्त दुधाची चाचणी करण्यासाठी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शासनाच्या २ प्रयोगशाळा आहेत. प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल.’’

नागरिकांना निर्मळ दूध मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

दुधातील भेसळ हा लोकांच्या जीवनाशी निगडीत विषय आहे. दुधात भेसळ करणार्‍यांना फाशीची शिक्षा असावी, यासाठी राज्यशासनाने केलेला कायदा संमत होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता; मात्र फाशीची शिक्षा असंमत करण्यात आली आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाला आवश्यक ते मनुष्यबळ देण्यात येईल, तसेच त्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांना निर्मळ दूध मिळावे, यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करेल.