…हा हिंदुत्वावर आघात करायचा क्रूर प्रयत्न आहे, हे ओळखले पाहिजे !

‘जो अपने आप को हिंदू कहलाता है.. वो २४ घंटे हिंसा, हिंसा.. नफरत.. नफरत करता है ।’, हे वक्तव्य आहे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे ! लोकसभेत १ जुलै २०२४ या दिवशी त्यांनी वरील वक्तव्य केले. हे वक्तव्य दायित्वशून्य किंवा बालीशपणाचे नाही. हा ठरवून केलेला उद्दामपणा आहे. जॉर्ज सोरोसप्रणित ‘डिसमेंटलिंग हिंदुत्व’चे (हिंदुत्वाचे उच्चाटन) जाहीर प्रगटन आहे. संसदेत केलेल्या वक्तव्यावर बाहेर कुणी न्यायालयात दाद मागू शकत नाही. म्हणून ते तिथे केलेले आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून हिंदुत्वाला सुरूंग लावण्याच्या कामाचे नेतृत्व त्यांनी स्वतःकडे घेतल्याचे घोषित करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘आज हिंदु संघटित होत नाहीत, तसेच ते संघटित मतपेढी म्हणून वावरत नाहीत. हिंदूंमध्ये जातीपातींवरून सहज फूट पाडता येते. ते ‘फेक नॅरेटिव्हज’ना (खोट्या कथानकांना) सहज फसून सांस्कृतिक ऐक्यावर पाणी सोडू शकतात’, या गृहितकांवर राहुल यांनी खेळलेला हा जुगार आहे.

काँग्रेसचा उघड साम्यवाद

काँग्रेस पूर्वी छुप्या रितीने साम्यवाद्यांकडे झुकलेले होते. सत्तापदांवर ‘कोअर (मूळ) काँग्रेसजन’, ॲकेडेमिया / मिडियामध्ये ‘कोअर लेफ्टिस्ट’ (मूळ साम्यवादी) अशी ही बिनबोभाट वाटणी होती. वर्ष २०१४ नंतर काँग्रेसच्या साम्राज्याला सुरूंग लागले. हिंदु विचारधारा आणि हिंदु जीवनमूल्ये समाजकारण अन् राजकारण यांच्या केंद्रस्थानी आली. यामुळे पिछेहाट झालेल्या साम्यवादी विचारधारेने अस्वस्थ होऊन ‘कल्चरल मार्क्सिजम’ला (सांस्कृतिक मार्क्सवाद) गती दिली. लोकांना त्यांच्या जीवनमूल्यांविषयी, त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी द्वेष वाटला पाहिजे, लाज वाटली पाहिजे, हे यांचे पहिले उद्दिष्ट आहे. त्यासाठी द्वेष, असत्य आणि हिंसा यांचे साहाय्य घेणे हे यांचे वैशिष्ट्य ! काँग्रेस प्रछन्नपणे साम्यवादी, त्यातही ‘कल्चरल मार्क्सिजम’मय झालेली आहे याचे हे लक्षण !

 काँग्रेसचा साम्यवाद सर्वच श्रद्धाकेंद्रांचा नाश करणारा !

काँग्रेसचे साम्यवादी नसलेले जे ‘कोअर’ कार्यकर्ते असतील, त्यांनी यावर विचार करायला पाहिजे. ‘कल्चरल मार्क्सिजम’ केवळ भाजप, संघ वा हिंदुत्व यांचा नाश करायला निघालेले नाही. ते तुमच्या सर्वच श्रद्धाकेंद्रांचा नाश करायला जाणार आहे. त्याची परिणीती ‘वोकिजम’मध्ये होऊन सर्वांच्याच पुढच्या पिढ्या त्यामुळे नासणार आहेत ! (जभगरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती म्हणजे वोकिझम.) हे भाषण जर संसदेबाहेर केले असते, तर भयंकर दर्जाचे ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) म्हणूनच गणले गेले असते. त्याला सुप्रतिष्ठा मिळता कामा नये. हे धोकादायक आहे. हे वक्तव्य म्हणजे कूल (शांतपणे)/ बालिश / ‘प्रोग्रेसिव्ह’ (पुढारलेले)/‘स्लीप ऑफ टंग’ (जीभ घसरली) यांपैकी काहीही नाही. हा हिंदुत्वावर आघात करायचा क्रूर प्रयत्न आहे, हे ओळखले पाहिजे.

– प्रसन्ना पाटील (साभार : फेसबुक)