दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईत मगरीच्या पिल्लाची तस्करी करणारा अटकेत !; कल्याणमधील लाचखोर पोलिसावर गुन्हा नोंद !…

मुंबईत मगरीच्या पिल्लाची तस्करी करणारा अटकेत !

मुंबई – पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करणार्‍या तरुणाला वन विभागाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १० जुलै या दिवशी अटक केली. तस्करी केलेले मगरीचे पिल्लू विकण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.


कल्याणमधील लाचखोर पोलिसावर गुन्हा नोंद !

कल्याण – एका गुन्ह्याच्या प्रकरणात तक्रारदाराकडून ७ लाख रुपयांची लाच मागणारा आणि तडजोडीने ५ लाख रुपये स्वीकारण्यास सिद्ध झालेला कल्याणमधील हवालदार सुचित टिकेकर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने १० जुलै या दिवशी गुन्हा नोंदवला.

संपादकीय भूमिका : अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी ! भ्रष्टाचार्‍यांचा भरणा असलेले पोलीस खाते !


खड्ड्यांविरोधात मनसेचा अपंग मोर्चा !

पनवेल – पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांमधील खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेल पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. मनसेचे कार्यकर्ते हाता-पायाला मलमपट्ट्या लावून पालिकेत शिरण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पोलिसांनी त्यांना पालिकेच्या प्रवेशद्वावरच रोखले. ‘महानगर गॅसवाहिनीचे काम चालू असल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी चालावे कुठून ?’, असा प्रश्न मनसेच्या कार्यकत्यांनी उपस्थित केला.

संपादकीय भूमिका : असे मोर्चे काढण्याची वेळ येणे प्रशासनाला लज्जास्पद !


५ ऑगस्टपासून मराठा आरक्षणावर सुनावणी होणार !

मुंबई – मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या याचिकांवर सरकारच्या वतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू मांडण्यात येत आहे; मात्र आयोगाचे अधिवक्ता विदेशात असल्याने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आयोगाच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांची मुदतवाढ आयोगाला दिली आहे. ५ ऑगस्टपासून पुढील सुनावणी होणार आहे.


राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ !

पुणे – राज्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. धरणांमध्ये ८ दिवसांत ६८.२४ टी.एम्.सी.ने पाणीसाठा वाढला आहे. ९ जुलैपर्यंत राज्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा २६.६१ टक्क्यांवर म्हणजे ३८०.६७ टी.एम्.सी.वर गेला आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवडाभरापासून प्रामुख्याने पश्चिम घाट, मध्य महाराष्ट्र येथे होत असलेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील धरणांत सर्वांत जास्त ६१.४० टी.एम्.सी.ने पाणीसाठा वाढला आहे.