ईश्वराचे अस्तित्व मानण्यावर किंवा न मानण्यावर जीवनाची यशस्विता अवलंबून आहे का ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्नाच्या उत्तराकडे वळण्यापूर्वी ‘यशस्वी जीवन’ म्हणजे काय, हे स्पष्ट झाले असते, तर सोयीचे ठरले असते. जर चंगळवादी, म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’, हा सिद्धांत गृहीत धरून तसे जीवन, म्हणजे यशस्वी जीवन म्हटले, तर त्यासाठी ईश्वराची आवश्यकता नसून मुबलक संपत्तीची आवश्यकता आहे.

प.पू. स्वामी वरदानंद भारती

अशा प्रकारचे जीवन हे तात्कालिक आणि छान-आकर्षक वाटले, तरी ते परिणामतः अत्यंत त्रासदायक ठरणारे असते. ज्यांनी आपल्या जीवनातील महत्त्वाचा काळ अशा प्रकारे घालवला, त्यांना पुढे भयानक त्रास भोगावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

१. यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेला संयम हा ईश्वराच्या अस्तित्वाने शक्य !

यशस्वी जीवन म्हणजे निरामय, समाधानी जीवन असे ठरवले, तर त्यासाठी उचित आचारधर्माची आवश्यकता आहे. या आचारधर्माला अधिष्ठान म्हणून ‘ईश्वर’ या संकल्पनेवर श्रद्धा असणे उपयुक्त आहे. अनेकदा धार्मिक आचरणासाठी आवश्यक असलेला संयम हा ईश्वराच्या अस्तित्वाच्या धारणेने साधणे शक्य होते. ‘चौकामध्ये पोलीस उभा आहे’, या कल्पनेने वाहने व्यवस्थित जातात.

२. ईश्वराचे अस्तित्व कुणाच्या मानण्यावर किंवा न मानण्यावर अवलंबून नाही !

ईश्वराचे अस्तित्व हे कुणाच्या मानण्यावर किंवा न मानण्यावर अवलंबून नाही. ज्यांची मन-बुद्धी विकसित नाही, जे खोल-सूक्ष्म विचार करू शकत नाहीत, ते आपल्या मर्यादित सामर्थ्यामुळे भले नास्तिकवाद मानणारे असोत, ईश्वरी सत्ता त्यांच्या ठिकाणीही कार्यकारी असतेच. किंबहुना त्यांचा नास्तिकवादही ईश्वरी सत्तेच्या अधिष्ठानामुळेच मांडला जातो, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

समजा एखाद्या माणसाने (किंवा समूहाने) ‘मी पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण मानणार नाही’, असे म्हटल्याने काय होईल ? शास्त्रज्ञांच्या सभेत त्याला ‘अडाणी’ म्हटले जाईल. शास्त्राच्या कक्षेत मूर्ख ठरेल; परंतु तो काही पृथ्वीबाहेर फेकला जाणार नाही. याचे महत्त्वाचे कारण, म्हणजे ईश्वरी सत्ता ही ईश्वराच्या योजनेनेच कार्यकारी असते. मानवाच्या मान्यतेवर नव्हे !

३. ईश्वराचे अस्तित्व न मानणार्‍या व्यक्तीची आणि त्याच्या प्रभावाखालील समाजाची हानी होते !

आस्तिक असणार्‍या मानवाला जीवनातील संघर्ष यशस्वीपणे करतांना त्याची ईश्वराविषयीची प्रामाणिक श्रद्धा अद्भुत प्रेरणा शक्ती देत असते. ‘माझ्यासमवेत परमेश्वर आहे’, ही श्रद्धा वाटल्यास आशावाद म्हणा, विजिगीषु कार्यशक्ती स्थिर करून वाढवण्यास उपयुक्त आहे. अशा कठीण प्रसंगी नास्तिक माणूस एकाकी पडतो आणि परिणामतः खचून जातो. त्याची असलेली कार्यशक्ती न्यून होते. त्या व्यक्तीची आणि अशा व्यक्तीच्या प्रभावाखाली जाणार्‍या समाजाचीही हानी होते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)

(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)