जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले !
इंदापूर (जिल्हा पुणे) – अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणामध्ये, टाळ, मृदंग आणि विणेच्या झंकारामध्ये, ‘ग्यानबा-तुकारामा’च्या गजरामध्ये वारकरी आणि भाविक यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसर्या गोल रिंगणाचा १० जुलै या दिवशी आनंद घेतला. सवा घंटा रंगलेल्या या रिंगण सोहळ्याला असंख्य वारकर्यांची उपस्थिती लाभली.
देहू देवस्थान आणि निमगाव केतकी ग्रामस्थांनी सकाळी पादुकांना अभिषेक केला. काकड आरतीचे अभंग झाल्यानंतर ६ वाजता पालखी सोहळा इंदापूरकडे मार्गस्थ झाला. तरंगवाडी कालवा आणि गोकुळीचा ओढा येथील विसाव्यानंतर १२ वाजता नगारखाना अश्व रिंगणामध्ये पोचला. पालखी रथातून रिंगणामध्ये स्थानापन्न झाली. प्रारंभी पताकाधारी, हंडा-तुळस घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, सेवेकरी, टाळकरी आणि मृदंगवादक यांची प्रदक्षिणा झाली. त्यानंतर दोन्ही अश्वांनी रिंगण दाखवण्याची १ प्रदक्षिणा पूर्ण केली. नंतर बाबुळगावकरांचा देवाचा अश्व आणि अकलूज येथील मोहिते-पाटील यांचा स्वाराचा अश्व रिंगणामध्ये धावले. या दोन्ही अश्वांनी नेत्रदीपक अशा ३ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. दिंडी मालकांच्या सूचनेनुसार, नामदेव चोपदार यांनी उडीच्या खेळासाठी टाळकर्यांना बोलवले. ‘भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ।।’ हा अभंग झाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची आरती झाली. त्यानंतर पालखी रथामध्ये ठेवून पालखी सोहळा इंदापूर येथील आय.टी.आय. मैदानावर विसावला.
सातारा पोलिसांच्या अरेरावीचा वारकर्यांना त्रास !
वाहतूक व्यवस्थेचे ढिसाळ नियोजन आणि सातारा पोलिसांची अरेरावी यांचा अनुभव १० जुलै या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यांतील वारकर्यांना आला. फलटण शहरातून दिंड्यांची वाहने बरडकडे सोडण्यावरून शाब्दिक चकमक झाली. यात पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर जळगावकर यांना एका पोलीस अधिकार्याने ‘आत टाकू का ?’ असा दम दिला. फलटणच्या पालखी तळावरून रथ बाहेर काढण्याच्या वेळी बाळासाहेब चोपदार, पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, भावार्थ देखणे यांनाही पोलिसांच्या अरेरावीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ म्हणाले, ‘‘पालखी सोहळा सातारा जिल्हा परिसरात आल्यानंतर पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत अनेक त्रुटी राहिल्या. पोलिसांची संख्या केवळ कागदोपत्रीच आहे. सकाळी पोलीस बंदोबस्त नसल्याने आम्ही रस्त्यावर उतरून रथाला जागा करून दिली. रथासमवेत दिंड्यांच्या जेवणाची आणि तंबूची वाहने जाणे महत्त्वाचे असते, ती वाहने न सोडल्याने असुविधा झाली. (याविषयी पोलीस प्रशासनाने उत्तर देणे आवश्यक ! – संपादक)