तिरुचेंदूर (तमिळनाडू) येथील सुब्रह्मण्यस्वामी मंदिरात सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत पार पडला ‘सुब्रह्मण्य होम’ !

होमाला नमस्कार करतांना श्रीचितशक्ती (सौ.) अंजली गाडगीळ

तिरुचेंदूर (तमिळनाडू) – येथील सुब्रह्मण्यस्वामी, म्हणजेच कार्तिकेयच्या मंदिरात सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत ११ जुलै या दिवशी ‘सुब्रह्मण्य होम’ पार पडला. ७ जुलै २०२४ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या नाडीपट्टी वाचनामध्ये महर्षींनी सांगितले, ‘सध्या साधकांवर सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींची आक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे साधकांचे शारीरिक त्रास वाढले आहेत. साधकांचे सूक्ष्मातील आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कार्तिकेय देवाला प्रार्थना करावी, तसेच त्यांच्या उपस्थितीत तिरुचेंदूर (तमिळनाडू) येथील सुब्रह्मण्यस्वामी मंदिरात जाऊन ‘सुब्रह्मण्य होम’ करावा.’ महर्षींच्या आज्ञेनुसार ११ जुलै या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उपस्थितीत ‘सुब्रह्मण्य होम’ पार पडला. या वेळी मंदिराचे पारंपरिक पुजारी श्री. महाराजा लक्ष्मी अय्यर यांनी पूजा आणि होम यांची सिद्धता केली होती.

होम झाल्यावर भावपूर्ण प्रार्थना करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि समवेत पुजारी

मयुरावर आसनस्थ शत्रूसंहारक कार्तिकेयाच्या मूर्तीसमोर पूजाविधी संपन्न झाला. प्रारंभी श्री गणपती पूजन आणि नंतर नवग्रह पूजा झाली. त्याआधी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गर्भगृहात जाऊन श्री सुब्रह्मण्यस्वामीदेवाकडे संकल्प आणि प्रार्थना करून आल्या. ६ वेद ब्राह्मणांनी पूजाविधी केले आणि नंतर शत्रूसंहार मूर्तीला अभिषेक करण्यात आला.

सुब्रह्मण्यस्वामी मंदिराची माहिती

सुब्रह्मण्यस्वामी मंदिर, तिरुचेंदूर हे मुरुगन (कार्तिकेय) यांना समर्पित प्राचीन हिंदु मंदिर आहे. तमिळनाडू येथे असलेल्या मुरुगन यांच्या ६ निवासस्थानांपैकी हे दुसरे स्थान आहे. मुरुगन देवाने सुरपद्मनचा वध केला, त्याविषयी स्कंद पुराणमध्ये तिरुचेंदूरचा उल्लेख तपशीलवार केलेला आढळतो. ज्या दिवशी मुरुगनने सुरपद्मनाचा वध केला, तो दिवस सर्व मुरुगन मंदिरांमध्ये ‘स्कंद षष्ठी उत्सव’ म्हणून साजरा केला जातो.

वैशिष्ट्यपूर्ण

१. ‘सुब्रह्मण्य होम’ चालू असतांना दुपारी ४.५० ते ५ या वेळेत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या यज्ञकुंडाच्या परिसरात पोपट किलबिलाट करत होते. पोपटाच्या रूपातून देवतांनी प्रचीती दिल्याचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवले. (पोपट हे देवतांचे संदेशवाहक आहेत. पार्वतीदेवी पोपटांच्या माध्यमातूनही शिवाला संदेश देते. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे यज्ञाच्या वेळी कार्तिकेयाचा जप आणि प्रार्थना करत होते. ही प्रार्थना आणि जप कार्तिकेयापर्यंत आम्ही पोचवत आहोत, अशी अनुभूती पोपटांनी किलबिलाट करून मला दिली. – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ)

२. यज्ञ चालू असतांना सुब्रह्मण्यस्वामी मंदिरावर ३ मोर बसले होते.

३. नवग्रहांच्या पूजेत मंगळ ग्रहाची पूजा चालू असतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नागदेवतेचे दर्शन झाले. विशेष म्हणजे मंगळ ग्रहाची अधिदेवता कार्तिकेय आहे.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या / संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक