वरिष्‍ठ महिला पोलीस अधिकार्‍यांद्वारे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री तथा उपमुख्‍यमंत्री  

विधान परिषदेतून…

केडगाव (दौंड) येथील पंडिता रमामाई मुक्‍ती मिशन  ख्रिस्‍ती संस्‍थेत २ अल्‍पवयीन हिंदु मुलींचे धर्मांतर आणि छळ !

हिंदु मुलींचे धर्मांतर आणि छळ

मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – पंडिता रमामाई मुक्‍ती मिशन  केडगाव (तालुका दौंड, जिल्‍हा पुणे) या ख्रिस्‍ती संस्‍थेत अनुसूचित जातीच्‍या खाटिक समाजातील २ अल्‍पवयीन हिंदु मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्‍यांना धर्मांतर करण्‍यास भाग पाडण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍यावर अन्‍याय केलेल्‍या गोष्‍टींची वरिष्‍ठ महिला पोलीस अधिकार्‍यांच्‍या वतीने तक्रारीनुसार चौकशी केली जाईल. चौकशीत जे दोषी आढळतील, त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री तथा उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. भाजपच्‍या आमदार श्रीमती उमा खापरे यांनी औचित्‍याच्‍या सूत्राद्वारे हा विषय मांडला होता.

आमदार श्रीमती उमा खापरे म्‍हणाल्‍या की,

१. अनुसूचित जातीच्‍या खाटिक समाजातील २ अल्‍पवयीन हिंदु मुलींना दौंड येथे परदेशी निधीद्वारे समर्थित पंडिता रमाबाई मुक्‍ती मिशन या ख्रिस्‍ती संस्‍थेत सामील होण्‍यास सक्‍ती केल्‍याची अत्‍यंत गंभीर गोष्‍ट निदर्शनास आली आहे.

२. संबंधित मुलींच्‍या आईचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याने मुलीच्‍या मावशीने त्‍यांना या संस्‍थेत सामील करून घेण्‍यासाठी संध्‍या वासवे नामक महिलेला भाग पाडले.

३. मुलींचे धर्मांतर करण्‍यासाठी त्‍यांच्‍या नातेवाइकांना मोठे आर्थिक आमीष दाखवण्‍यात आले. मुलींना मिशनच्‍या वसतीगृहात गैरवर्तनाला सामोरे जावे लागले.

४. त्‍यांच्‍यावर शारीरिक आणि मानसिक अत्‍याचार केले जात आहेत. मिशनला भेट देण्‍यासाठी आलेल्‍या परदेशी नागरिकांसमवेत फाटलेले कपडे आणि वेडेवाकडे केस कापून त्‍यांच्‍यासमवेत छायाचित्रे काढण्‍यास भाग पाडण्‍यात आले आहे.

५. या हिंदु मुलींना हिंदूंच्‍या देवतांची पूजा करण्‍यापासून रोखले जात असे. याविषयी भारतीय मानवाधिकार परिषदेने अभ्‍यास करून बनवलेला अहवाल पोलिसांना सुपुर्द केला आहे.

६. या प्रकरणी पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. त्‍या वेळी केलेल्‍या अन्‍वेषणात पोलिसांचा हलगर्जीपणा निदर्शनास आला आहे.

७. स्‍थानिक पोलीस प्रशासन आणि काही अधिकारी यांच्‍या सहकार्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतरासारखे प्रकार होत आहेत. (जी गोष्‍ट आमदार श्रीमती उमा खापरे यांना दिसते, ती गोष्‍ट वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांना का दिसत नाही ? अशा अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्‍यांच्‍यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे ! – संपादक)    

८. संबंधित संस्‍थेवर प्रशासक बसवण्‍याविषयी अनेक सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी शासनाला पत्रव्‍यवहार केला आहे; परंतु या गंभीर गोष्‍टीकडे न पाहिल्‍यामुळे पालकांमध्‍ये तीव्र असंतोष पसरला आहे. याविषयी गृह विभागाच्‍या अध्‍यक्षतेखाली एक समिती गठीत करून तिचा चौकशी अहवाल शासनास तात्‍काळ सादर करणे आवश्‍यक आहे.