Pakistan Beggars : परदेशात जाऊन भीक मागणार्‍या पाकिस्तानातील २ सहस्र भिकार्‍यांचे पारपत्र रहित !

  • देशाची अपकीर्ती टाळण्यासाठी पाकिस्तान सरकारची कारवाई !

  • यात्रेकरू बनून जात होते परदेशात !

  • महागाईमुळे पाकिस्तानात भीक मिळत नसल्याने धरली परदेशात वाट !

इस्लामाबाद – परदेशात जाऊन भीक मागणार्‍या पाकिस्तानातील २ सहस्र भिकार्‍यांचे पारपत्र (पासपोर्ट) पाकिस्तान सरकारने रहित केले आहे. पाकिस्तानमधील ‘डॉन न्यूज’ने हे वृत्त प्रसारित केले आहे. सध्या गंभीर आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. पाकिस्तान सध्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांकडे पैशांची भीक मागत आहे. त्यामुळे देशात सध्या भीक मिळत नसल्याने पाकिस्तानमधील भिकार्‍यांनी परदेशाची वाट धरली आहे. यामुळे होणारी अपकीर्ती टाळण्यासाठी पाकिस्तान सरकारने या भिकार्‍यांचे पारपत्रच रहित केले आहे.

‘डॉन न्यूज’च्या वृत्तानुसार, अनेक भिकारी सौदी अरेबिया, इराण, इराक यांसारख्या देशांमध्ये तीर्थयात्रेसाठी किंवा उमराहसाठी जातात आणि तेथे पोहोचल्यानंतर भीक मागू लागतात. अशांची सूची जगभरातील पाकिस्तानी दूतावासांकडून गोळा करण्याचा आदेश पाकिस्तान सरकारने दिला आहे. परदेशात भीक मागतांना पकडलेल्या भिकार्‍यांचे पारपत्र ७ वर्षांसाठी निलंबित केले जाऊ शकते. अशा लोकांमुळे पाकिस्तानची, तसेच विदेशात रहाणार्‍या पाकिस्तानी नागरिकांची प्रतिष्ठादेखील न्यून होते. यामुळेच पाकिस्तान सरकारने ही धडक कारवाई केली आहे. यासह या भिकार्‍यांना साहाय्य करणार्‍या दलालांचेही पारपत्र सरकार रहित करणार आहे.

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांना पोसायचे सोडले नाही, तर पाकिस्तानची स्थिती यापेक्षा वाईट होईल !