दशक्रिया विधीच्या वेळी होणारी राजकीय भाषणे बंद करावीत !
|
पुणे – गावात दशक्रिया विधी असला की, त्या विधीसाठी नातेवाईक आणि गावकरी एकत्र येतात. त्याचा राजकारणी लोक लाभ घेत भाषण करतात. भाषणामध्ये एकमेकांवर टीकाटिपणी केली जाते. या राजकीय भाषणांना कंटाळून उरुळी कांचन (तालुका हवेली) येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमी परिसरामध्ये ‘राजकीय भाषणबाजी बंद करून सहकार्य करावे’, अशा आशयाचा फलक लावला आहे. या भाषणाचा नाहक त्रास कुटुंबियांना, तसेच उपस्थित नागरिकांना सोसावा लागत आहे. या राजकीय भाषणांना नागरिक कंटाळले आहेत, त्याचा समस्त गावकर्यांनी फलकाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.
फलकावर ‘मयत (मृत्यूचा दिवस) आणि दहावा हा त्या कुटुंबांसह नातेवाईकांसाठी पुष्कळ मोठा दु:खाचा प्रसंग असतो. सर्वांनी श्रद्धांजली वाहून राजकीय लाभ घेण्यासाठी लोकांना वेठीस धरणे थांबवले पाहिजे. उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठाने एकच श्रद्धांजली वाहून शेवट करावा. मयत आणि दहाव्यामधील भाषणे राजकीय पुढार्यांनी बंद करून लोकांना सहकार्य करावे.’ अशा लिखाणाचा फलक लावण्यात आला आहे.