भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना ! – मोनिका सिंह ठाकूर, अपर जिल्हाधिकारी
पंढरपूर – आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने आवश्यक सिद्धता केली आहे. यात्रेत भाविकांच्या सोयी-सुविधा, स्वच्छता, तसेच सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे. भाविकांना अडचण आल्यास १८००-२३३-१२४० या ‘टोल फ्री’ क्रमांकावर, तसेच ०२१८६ – २२०२४० आणि २९९२४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले आहे.
भाविकांच्या सुविधेसाठी ‘पंढरीची वारी’ ॲप चालू !
पालखी मार्गावर येणार्या अडचणी सोडवण्यासाठी, तसेच भाविकांच्या सुविधेसाठी ‘पंढरीची वारी’ ॲप चालू करण्यात आले आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.aashadhi_wari येथे ते उपलब्ध आहे. ज्या महामार्गावरून दिंडी सोहळा येणार आहे, त्यातील वारीचे मुक्कामाचे ठिकाण, पोलीस ठाणे, मंदिर, पाण्याचा टँकर, रुग्णालय, वाहनतळ, शाळा, शौचालय, जवळपासची शासकीय कार्यालये आदी ठिकाणांची माहिती या ॲपद्वारे मिळणार आहे. तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.