कांदा खरेदीमध्ये अपव्यवहार झाल्याचे उघड !
पुणे – कांदा उत्पादक आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाच्या (एन्.सी.सी.एफ्.) वतीने राज्यात होत असलेल्या कांदा खरेदीत अपव्यवहार होत असल्याचा आरोप सातत्याने करत होते. अन्वेषणानंतर त्यांच्या आरोपात तथ्य असल्याचे आढळून आले आहे. नाफेड आणि एन्.सी.सी.एफ्.कडून होणार्या कांदा खरेदीच्या अपव्यवहाराचा आरोप असलेल्या २ अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. कांदा खरेदीमध्ये सहभागी झालेले शेतकरी, उत्पादक आस्थापने, खरेदी-विक्री सोसायटी महासंघ यांची चौकशी चालू आहे.
नाफेडचे देहली येथील कांदा खरेदी विभागाचे साहाय्यक व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार सिंह आणि नाफेडच्या नाशिक येथील कार्यालयातील लेखापाल हिमांशू यांची तातडीने बदली केली आहे. एकाच गोदामातील कांदा पहिल्यांदा एन्.सी.सी.एफ्.चा आणि पुन्हा नाफेडचा असल्याचे दाखवून खरेदीमध्ये अपव्यवहार केला आहे.
राज्य सरकारने कोणत्या गावातील ? कोणत्या शेतकर्याचा ? किती कांदा खरेदी केला आहे ?, हे घोषित करावे. अधिकार्यांचे स्थानांतर करून झालेला अपव्यवहार दाबण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.
नाफेड आणि एन्.सी.सी.एफ्. या संस्थां ग्राहक हितासाठी काम करतात. त्यांच्याकडून शेतकरी हित साधले जाणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून होणारी खरेदी बंद करावी. टंचाईच्या काळात केंद्राने खुल्या बाजारातून किंवा थेट शेतकर्यांकडून कांदा खरेदी करावा. ग्राहक हितासाठी सातत्याने शेतकर्यांना त्रास दिला जात आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाअपव्यवहार केलेल्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |