कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक मालपे, पेडणे येथे पुन्हा ठप्प
|
पणजी, १० जुलै (वार्ता.) – कोकण रेल्वेमार्गावर मालपे, पेडणे येथे बोगद्यातील अडथळे ९ जुलैच्या रात्री १०.३० वाजता दूर करण्यात आले होते आणि त्यानंतर या मार्गावरून ‘वेरावल एक्स्प्रेस’ मार्गस्थ झाली होती; मात्र उत्तररात्री ३ वाजता रेल्वेमार्ग पुन्हा ठप्प झाला. कोकण रेल्वेमार्गावर मडुरे-पेडणे विभागात मालपे, पेडणे येथील बोगद्यात पाणी येऊ लागल्याने रुळावर पुन्हा चिखल आणि माती साचली अन् रेल्वेमार्ग पुन्हा बंद करण्यात आला. रेल्वेमार्गावरील अडथळा दूर करण्यासाठी १०० हून अधिक कामगार राबत आहेत. १० जुलै या दिवशी रात्री रेल्वेमार्ग चालू होण्याची शक्यता कोकण रेल्वे व्यवस्थापनाने वर्तवली आहे.
कोकणे रेल्वेचे अधिकारी संतोष कुमार झा ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर कामाविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘संबंधित ठिकाणी १०० हून अधिक कामगार, तसेच रेल्वेच्या मुख्य अभियंत्यापासूनचे अधिकारी आणि सल्लागार कार्यरत आहेत. संबंधित ठिकाणी आंतरराष्ट्रीय सल्लागारांना सायंकाळी पाचारण करण्यात येणार आहे. बोगद्यामध्ये खालून येणारे पाणी रोखण्यासाठी कोकण रेल्वे व्यवस्थापन पूर्णपणे प्रयत्न करणार आहे.’’
कोकण रेल्वे वेळापत्रकात पालट
श्री गंगानगर-कोचूवेली एक्सप्रेस, वास्को-द-गामा पटना जंक्शन एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम् लोकमान्य टिळक एक्सप्रेस आणि थिरुनेलवेल्ली-दादर एक्सप्रेस या रेल्वेंच्या मार्गात पालट करण्यात आला आहे, तर मडगाव जंक्शन ते मुंबई मार्गावरील कोकणकन्या एक्सप्रेस सावंतवाडी येथून धावणार आहे.
कोकण रेल्वेच्या रेल्वेगाड्या रहित
लोकमान्य टिळक थिरुवनंतपुरम् रेल्वे (रेल्वे क्रमांक १६३४५), लोकमान्य टिळक मंगळुरू सेंट्रल एक्सप्रेस (रेल्वे क्रमांक १२६१९), मडगाव-मुंबई मांडवी एक्सप्रेस, मडगाव-सावंतवाडी लोकल, मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस, मडगाव-मुंबई जनशताब्दी आणि सावंतवाडी रोड ते दिवा एक्सप्रेस या रेल्वे रहित करण्यात आल्या आहेत.
रेल्वेतील प्रवाशांना बसमार्गे सावंतवाडी येथून मडगावला आणण्यात आले
मंगळुरू रेल्वे सावंतवाडी स्थानकावर थांबवून त्यातील प्रवाशांना बसद्वारे मडगाव येथे आणण्यात आले आणि मडगाव येथून प्रवाशांना दुपारी ३.३० वाजता मंगळुरू येथे नेण्यात आले.
वेळापत्रक कोलमडल्याने मडगाव रेल्वेस्थानकावर प्रवासी अडकले
मडगाव – कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने मडगाव रेल्वेस्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. अडकून पडलेले प्रवासी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालू लागले आहेत.