आमदार नितेश राणे यांनी उच्चारलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी हे शब्द भारतियांच्या भावना दुखावणारे नाहीत ! – राज्य सरकार
न्यायमूर्तींच्या खंडपिठाची सरकारच्या भूमिकेला मान्यता
मुंबई – मीरा रोड येथे जानेवारीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर भाजपचे आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांनी भाषणात उच्चारलेले ‘रोहिंग्या’ आणि ‘बांगलादेशी’ हे शब्द भारतियांच्या भावना दुखावणारे नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने पोलिसांच्या निष्कर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयात मांडली. आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करणे अन् सामाजिक सलोखा बिघडवणारे कृत्य केल्याच्या आरोपाप्रकरणी ४ गुन्हे नोंदवण्यात आले होते.
राणे आणि जैन यांचे भाषण रोहिंग्या अन् बांगलादेशी यांच्या विरोधात होते. रोहिंग्या आणि बांगलादेशी हे भारतीय नाहीत. त्यांनी भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश केला असून ही गोष्ट सर्वमान्य आहे. त्यामुळे या २ शब्दांनी कोणत्याही भारतियाच्या किंवा येथील कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जात नाहीत, असे सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले. न्यायमूर्तींच्या खंडपिठाने सरकारी अधिवक्त्यांचे हे म्हणणे मान्य केले.