मराठा आरक्षणाविषयी महायुतीचे नेते राजकारण करत आहेत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
मुंबई, १० जुलै (वार्ता.) – सत्ताधारी पक्षाचे लोक मराठा आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेत आहेत. ३ पक्षांच्या ३ नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने आहेत. सर्वपक्षियांच्या नावाखाली विरोधी पक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारणाचा प्रकार चालू आहे. आरक्षणाच्या संदर्भात सरकारला राजकारण करायचे आहे. सरकार काय निर्णय घेते, ते त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते भूमिका मांडत होते.
विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला येणे आवश्यक होते ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
९ जुलै या दिवशी राज्याच्या प्रमुख नेत्यांनी मराठा ओबीसी आरक्षणाविषयी बैठक बेालावली होती; पण तेथे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी येणे आवश्यक होते. त्यांची भूमिका जर कुणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट झाले, तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसेल, असा विचार करून ते बैठकीला आले नाहीत. यातून मराठा आणि ओबीसी यांना समजले आहे की, महाविकास आघाडीला केवळ या विषयावर राजकारण करायचे आहे.