‘नामसंकीर्तन’ या कलियुगातील ईश्वरप्राप्तीसाठीच्या सोप्या साधनामार्गाविषयी चेन्नई येथील पू. (श्रीमती) कांतीमती संतानम् (वय ८६ वर्षे) यांनी उलगडलेली सूत्रे !
१. नामसंकीर्तन किंवा नादोपासना
‘नामसंकीर्तन’ हा कलियुगातील ईश्वरप्राप्तीसाठीचा सोपा आणि आनंददायी साधनामार्ग आहे. ‘नामसंकीर्तन’ ही ‘नादोपासना’ आहे. ‘नादोपासना’ म्हणजे विविध संतांनी रचलेली विविध भाषांतील भक्तीगीते, कर्नाटक संगीतातील विविध राग आणि ताल ईश्वराच्या चरणकमली सादर करणे. संतांनी रचलेली भक्तीगीते आध्यात्मिक भावाने समृद्ध असतात. प्रत्येक भक्तीगीतात सखोल अर्थ दडलेला असतोे.
२. ‘नामसंकीर्तना’मधे बोदेंद्र सरस्वती स्वामी, श्रीधर अय्यावाळ अणि मरुदानल्लूर वेंंकटरामा सद्गुरु हे तीन प्रमुख आदरणीय गुरु मानले गेले आहेत.
३. मरुदानल्लूर वेंंकटरामा सद्गुरु स्वामी यांनी ‘नामसंकीर्तना’ची, म्हणजे भजनी संप्रदायाची रचना केलेली असणे
मरुदानल्लूर वेंंकटरामा सद्गुरु स्वामी यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून तमिळ, मल्याळम्, तेलुगु, कन्नड, मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या भाषांमधील सर्व भक्तीगीतांची मांडणी सुव्यवस्थितपणे केली आहे. त्याद्वारे त्यांनी ‘नामसंकीर्तना’चा जणू रत्नजडित हारच सिद्ध केला आहे. त्यांनीच ‘नामसंकीर्तना’ची, म्हणजे भजनी संप्रदायाची रचना करून तो घडवला. या सर्व भक्तीगीतांमध्ये भक्तीभाव खोलवर रुजलेला आहे. त्यामुळे भजनी संप्रदायानुसार विविध भाषांतील भक्तीगीते सादर केल्यावर आपण भक्तीचे सार आणि त्याचा भावार्थ चांगल्या प्रकारे समजू शकतो.
४. भक्तीगीतांची केलेली मांडणी
‘ध्यानश्लोक, थोडय मंगळं, गुरुकीर्तन, साधूंचा गौरव (महिमा), अष्टपती, नारायण तीर्थर यांचे तरंगम्, भद्राचलम् रामदासस्वामी यांचे कीर्तन, कबीरदासांची भजने, पुरंदरदासांची कीर्तने, सदाशिव ब्रह्मेंद्र यांची कीर्तने, गोपाळकृष्ण भारती यांचे शिवकीर्तन, त्यागराज, मीराबाई, संत तुलसीदास, अशा अनेक संतांची भजने, पूजाविधी, उपचारकीर्तन, काशीसारख्या तीर्थक्षेत्रांचे श्लोक, पंचमुखी दिव्यामध्ये भगवंताला आवाहन करणारे गणेशादी ध्यानकीर्तन, दिव्याला प्रदक्षिणा घालतांना म्हणण्यात येणारे दिव्यनामकीर्तन, दीप समारूपणम्, प्रार्थना गीत, दोलोत्सव कीर्तन, राधा कल्याणम्, आंजनेय कीर्तन, भव्वळींपु कीर्तन’, या पद्धतीने या भक्तीगीतांची मांडणी केली गेली आहे. राधा कल्याणम् प्रमाणे मीनाक्षी कल्याणम्, वल्ली कल्याणम्, श्रीनिवास कल्याणम्, सीता कल्याणम् इत्यादींचीही प्रथा आहे. सर्व भक्तीगीते त्या त्या देवतांबद्दलची असली, तरी त्यांचे स्वरूप एकच असते.
५. आजच्या पिढीला भक्तीकडे, म्हणजेच भगवंताकडे आकर्षित करण्यासाठी या सर्व गोष्टी काळजीपूर्वक आणि पद्धतशीरपणे सिद्ध केल्या आहेत.’
– पू. (श्रीमती) कांतीमती संतानम् (वय ८६ वर्षे), चेन्नई (जून २०२४)