विरोधी पक्षांचे आमदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचा विधानसभेत गोंधळ !

दिवसभरासाठी कामकाज स्थगित !

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयी ९ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या बैठकीला येत असल्याचे सांगून विरोधक बैठकीला अनुपस्थित राहिले. यावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी १० जुलै या दिवशी विधानसभेत गोंधळ घातला. यामुळे विधानसभेचे कामकाज ४ वेळा स्थगित केल्यानंतरही सत्ताधार्‍यांनी गोंधळ चालूच ठेवला. शेवटी तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

१. मराठा आरक्षणाविषयी विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत येऊन घोषणा दिल्या. यामुळे सभागृहाचे कामकाज प्रारंभी ५ मिनिटे आणि त्यानंतर अनुक्रमे १० मिनिटे, ४५ मिनिटे अन् २० मिनिटे स्थगित करण्यात आले.

२. तारांकित प्रश्‍नानंतर भाजपचे आमदार अमित साटम यांनी बैठकीच्या अनुपस्थितीवरून विरोधकांना स्पष्टीकरण देण्याचे आवाहन केले. या कालावधीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जागेवर बसण्याचे सातत्याने आवाहन केले; मात्र तरीही सत्ताधार्‍यांनी गोंधळ चालूच ठेवला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र गोंधळामुळे त्यांना बोलता आले नाही.

३. सत्ताधिकार्‍यांकडून आमदार नीतेश राणे, आमदार आशिष शेलार, आमदार राम कदम यांनी मराठा आरक्षणाविषयी विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले. आशिष शेलार यांनी ‘विरोधकांनी बैठकीला येणार असल्याचे कळवले होते; मात्र अचानक कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी न येण्याचा निर्णय घेतला ?’, असा प्रश्‍न विचारला. यावर भाजपचे आमदार संजय कुटे यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून विरोधक बैठकीला अनुपस्थित राहिले’, असा आरोप केला.

४. आमदार भरत गोगावले, आमदार बबनराव लोणीकर, आमदार अमित साटम यांनीही मराठा आरक्षणाविषयी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.