मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक यांचा गदारोळ !
विधान परिषदेतून..
विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !
मुंबई, १० जुलै (वार्ता.) – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यातील सर्व पक्षप्रमुखांची बैठक ९ जुलै या दिवशी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केली होती; मात्र ‘आरक्षणाच्या संदर्भात ‘पुतना मावशी’चे प्रेम जे काहींच्या (विरोधकांच्या) मनात होते, ते ९ जुलै या दिवशी प्रकट झाले आहे. ते या बैठकीला आले नाहीत’, असे वक्तव्य विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी करताच सभागृहात विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. मराठा आरक्षणाच्या बैठकीला विरोधक अनुपस्थित राहिले होते. त्याचेच पडसाद १० जुलै या दिवशी सभागृृहात उमटले. सत्ताधारी आणि विरोधक यांनी तीव्र गदारोळ घालून घोषणा दिल्याने उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
१. विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा घंटा संपल्यानंतर विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात निवेदन केले. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडून गावागावांत जातीय तेढ मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. अशा वेळी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ‘महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन मार्ग काढावा’ अशा प्रकारची भूमिका घेतली. सर्व पक्षांच्या नेत्यांच्या भूमिकेचे स्वागत करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेऊन सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली आहे.
२. त्यानंतर दरेकर यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी उपसभापतीसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा देण्यास प्रारंभ केला.
३. डॉ. नीलम गोर्हे यांनी गोंधळातच सर्व विधेयक संमत केले, तसेच पूररक मागण्यांचा विषयही घेण्यात आला. या वेळी सत्ताधारी सदस्य आणि विरोधक गोंधळ घालतच होते. शेवटी डॉ. गोर्हे यांनी ‘सुरक्षारक्षकांना बोलवा’, असे सांगितले. शेवटी ‘प्रस्ताव आणि विधेयक प्रलंबित ठेवून दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात येत आहे’, असे सांगून त्यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.
विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक गदारोळ घालत असतांना उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दोन्ही गटांतील सदस्यांना ‘खाली शांतपणे बसा, गदारोळ करू नका’, असे वारंवार सांगितले; मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे डॉ. गोर्हे यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित करत असल्याचे घोषित केले. याला सर्वच सदस्यांनी अप्रसन्नता व्यक्त करत विरोध केला. या वेळी काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांसह काही सदस्य म्हणाले की, तुम्ही दिवसभरासाठी कामकाज कसे स्थगित केले ? कामकाज अशाच पद्धतीने चालणार का ? याकडे डॉ. गोर्हे यांनी दुर्लक्ष करून त्या निघून गेल्या. |
संपादकीय भूमिकाजसे शाळेत गोंधळ घालणार्या मुलांना शिक्षा होते, त्याप्रमाणे विधानसभेतही गोंधळ घालून वेळेचा अपव्यय करणार्या सदस्यांवर कारवाई करायला हवी, अशीच जनतेची अपेक्षा आहे ! |