PIL Against BJP Leaders : कर्नाटक : कथित द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणी भाजपच्या नेत्यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

महंमद खलीउल्ला यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेतील सूत्रांमध्ये सत्यता नसल्याचे न्यायालयाचे ताशेरे !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळली आहे. या नेत्यांवर द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप होता. खासदार रेणुकाचार्य, सी.टी. रवी, तेजस्वी सूर्या, प्रताप सिम्हा यांच्यासह राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. या वेळी न्यायालयाने याचिकाकर्ता महंमद खलीउल्ला यांच्यावर कडक ताशेरे ओढले. सरन्यायाधीश एन्.व्ही. अंजारिया यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने या प्रकरणाची सुनावणी करतांना म्हटले की, हे आरोप अतिशय सामान्य असून त्यांत सत्यता नाही. ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित आहे.

मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, तुम्ही (याचिकाकर्ता) अशा याचिका प्रविष्ट (दाखल) करून उच्च न्यायालयाच्या व्यासपिठाचा अपवापर करत आहात. न्यायालयाचा वेळ का वाया घालवत आहात ? ही जनहित याचिका म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाही.

संपादकीय भूमिका

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मुसलमानांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या, तरी मुसलमान जनता सरकारविरुद्ध कशा प्रकारे कार्यरत आहे ?, हे दर्शवणारे आणखी एक उदाहरण ! यातून भाजप काही धडा घेईल का ?