डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ अहिल्यानगर शहरात ‘ट्री गार्ड’सह शेकडो वृक्षांची लागवड !
नगर – डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ अहिल्यानगरमधील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर्.टी.ओ.) आणि केडगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात विविध प्रकारच्या शेकडो वृक्षांची ‘ट्री गार्ड’ (झाडाच्या सुरक्षेसाठी लावलेला पिंजरा) लावून वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड मोहिमेत शेकडो सदस्यांनी सद्गुरु सेवेच्या श्रद्धेने सहभाग घेतला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (तालुका-अलिबाग, जिल्हा- रायगड) यांच्या वतीने पद्मश्री, महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण अभियानाला सकाळी ७ वाजता प्रारंभ करण्यात आला. वृक्षारोपण करण्यासाठी जेसीबीने खड्डे काढण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी सुधीर पाटील आणि जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अनुमाने १५० वृक्षांचे रोपण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गोरक्ष कोरडे आणि आर्.टी.ओ. कार्यालयाचे वरिष्ठ साहाय्यक वैभव गावडे यांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आला. या ठिकाणी अनुमाने १०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. या सर्व वृक्षांचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी वृक्षारोपण करण्यात आलेल्या सर्वच वृक्षांना सुरक्षेसाठी उत्तम प्रतीचे ‘ट्री गार्ड’ लावण्यात आले.
या दोन्हीही ठिकाणी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज असून वृक्ष संवर्धन करण्यासाठी या मोहिमेला चळवळ बनवणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. या वेळी पिंपळ, निंब, चिंच, अंजन, कांचन, लक्ष्मी तरु, फापडा, करंज अशा बहुपयोगी वृक्षांचा समावेश होता. या सर्व वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी सर्व श्री सदस्यांनी आठवडयातून एकदा श्रमदान करण्याचा संकल्पही सोडला.
या वेळी दोन्हीही ठिकाणी झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेच्या प्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक श्रीमती स्मिता कोल्हे, गोरक्ष कोरडे, कार्यालयीन अधीक्षक कैलास मिसाळ, वरिष्ठ साहाय्यक वैभव गावडे, विनोद त्रिमूखे, साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चौधरी, श्रीमती नेटके, श्रीमती गांधी, पुरवठा निरीक्षक शिवराज पवार, गोदाम व्यवस्थापक प्रशांत पवार, वाहतूक प्रतिनिधी दिनेश नायक, आदित्य बडे, मोहन अंबेकर यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.