‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी महापालिकेची कार्यवाही चालू !
पुणे – केंद्र सरकारच्या वतीने ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटवण्याचे उद्दिष्ट ठेवून महापालिकेने या सर्वेक्षणाची सिद्धता चालू केली आहे. कामगिरी सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, अस्वच्छता पसरवणार्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करा, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या, अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या. स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या अंतर्गत कामगिरी संदर्भात आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त, सर्व परिमंडळ उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे साहाय्यक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, मोटार वाहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेविषयक कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. दंडात्मक कारवाईचा अहवालही या वेळी मांडला. आवश्यक साधनसामुग्री विषयी मागणीही करण्यात आली. पाणी साठणारी ठिकाणे साफ करणे, झिका आणि डेंग्यू विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती स्थाने आढळणार्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करणे आदी सूचना या बैठकीत दिल्या असून पुढील बैठकीत याचा आढावा घेतला जाईल, असे पृथ्वीराज बी.पी. यांनी स्पष्ट केले. कचरा संकलनासाठी गाड्यांची संख्या वाढवणे, कर्मचार्यांची संख्या वाढवणे, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी ठेकेदारांशी समन्वय करणे आदी संदर्भात आरोग्य निरीक्षक आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचार्यांनी समस्या मांडल्या.
संपादकीय भूमिकाकेवळ बक्षीस मिळवण्यासाठीच चांगली कामगिरी करण्यापेक्षा कायमच परिसर स्वच्छ रहाण्यासाठी उपाययोजना काढायला हव्यात ! |