पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील ‘एल्प्रो मॉल’मध्ये भारतीय संस्कृती नवीन पिढीला कळण्यासाठी वारीचा आकर्षक देखावा सिद्ध !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे), ९ जुलै (वार्ता.) – मॉल म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर पाश्चिमात्य संस्कृती येते. अशातच संस्कृती जपण्याच्या उद्देशाने पुण्ो येथील ‘एल्प्रो मॉल’मध्ये एक अत्यंत अनोखा, सुंदर आणि अतिशय आकर्षक वारीचा देखावा सिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये पांडुरंगाची मोठी मूर्ती, तसेच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती तसेच अनेक वारकरी सिद्ध करून लावण्यात आलेले आहेत. हा मनमोहक देखावा येणार्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.
देखावा सिद्ध करण्याचा मुख्य उद्देश सांगतांना ‘एल्प्रो मॉल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक कुमार म्हणाले की, महाराष्ट्रातील पुण्याला लाभलेली पालखीची परंपरा, तसेच आपले सांस्कृतिक वैभव येणार्या नवीन पिढीला कळावे या हेतूने मागील ३ महिन्यापासून आमची ‘टीम’ या देखाव्यावर काम करत आहे. त्यानंतरच वारकर्यांच्या हातातील टाळ, वीणा, पखवाज, भगव्या रंगाची पताका, तुळस आदी बारकाव्यांसह हा देखावा सिद्ध करण्यात आला आहे. २२ जुलैपर्यंत हा देखावा ठेवण्यात येणार आहे.