सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशीही पूरस्थिती
सिंधुदुर्ग – संपूर्ण जिल्हा ७ जुलैला अतीवृष्टीमुळे जलमय झाला होता. ८ जुलै या दिवशीही अतीवृष्टी झाली. त्यामुळे अनेक घरांतून, बाजारपेठांतून, शेती-बागायतीत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
खारेपाटण येथे शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. कणकवलीचे तहसीलदार देशपांडे यांनी या भागाला भेट देऊन पूरग्रस्तांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला.
मालवण तालुक्यात आचरा पारवाडी, कालावल येथे नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने धोका निर्माण झाला होता; मात्र ८ जुलैला दुपारनंतर पाऊस अल्प झाल्याने येथील संभाव्य धोका टळला आहे. या भागातील भातशेतीमधील पाणी न ओसरल्यास शेतीची हानी होण्याची शक्यता आहे.
कर्ली नदीला पूर आल्याने मालवण तालुक्यातील काळसे, बागवाडीतील घरांना पाण्याने वेढा दिला होता. शेतकरी, ग्रामस्थ यांनी त्यांची गुरे, वाहने, शेतीचे साहित्य सुरक्षित स्थळी हालवले; मात्र काही ग्रामस्थांचे साहित्य पुराच्या पाण्यात राहिले होते. याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह प्रशासनाच्या अधिकार्यांनी या भागाची पहाणी केली.
तेरेखोल नदीला आलेल्या पुरामुळे सातार्डा-भटपावणी येथे रस्ता आणि पूल नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झली. पुराच्या पाण्यात अडकलेल्या २ महिलांचे प्राण ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचले.
दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथे रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यातून एक चारचाकी गाडी वाहून गेली होती. यातील प्रवाशांना स्थानिक युवकांनी प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर काढले.
लोकप्रतिनिधींची पूरग्रस्त भागाला भेट
माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) आमदार वैभव नाईक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पहाणी केली, तसेच संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. खासदार राणे यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य तातडीने द्या, तसेच हानीचे पंचनामे तातडीने करा, अशा सूचना अधिकार्यांना दिल्या.
कणकवली येथील १० कोटी रुपये खर्चाच्या शासकीय विश्रामगृहाला गळती
सार्वजनिक बांधकाम विभागच्या वतीने कणकवली येथे नव्याने शासकीय विश्रामगृह बांधण्यात आले आहे. १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या इमारतीला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सर्वच कामांची अशी अवस्था असल्याने या कामांत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) आमदार वैभव नाईक यांनी केला.
माणगावमधील ब्रिटीश कालीन आंबेरी पुलाला भगदाड
कुडाळ – तालुक्यातील माणगांव खोर्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे कर्ली नदीला पूर आल्याने माणगांव-शिवापूर मार्गावरील ब्रिटीशकालिन आंबेरी पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे या परिसरातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. ८ जुलै या दिवशी सकाळी या पुलाचा काही भाग पुरात वाहून गेल्याचे उघड झाले. या पुलाला पर्यायी पूल येथे बांधण्यात आला आहे; मात्र नवीन पुलाच्या दोन्ही बाजूंचे जोडरस्ते पूर्ण न झाल्याने या पुलाचा वाहतुकीसाठी वापर करता येत नाही. त्यामुळे या रस्त्यांची कामे होईपर्यंत २७ गावांशी संपर्क होणे कठीण झाले आहे. चाफेली-काजरगोठणवाडी रस्त्यावरील कॉजवे (लहान पूल) वाहून गेला आहे. साडेनऊ लाख रुपये खर्च करून बांधलेला हा पूल वाहून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आपत्तीग्रस्त नागरिकांचे स्थलांतर
जिल्ह्यात पुराचे पाणी घुसल्याने अनुमाने १०० कुटुंबांची हानी झाली आहे. जवळपास ४०० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ओरोस येथे १० घरे पूर्णत: भूईसपाट झाली आहेत.
पावसाशी संबंधित अन्य सूत्रे
१. वैभववाडी तालुक्यातील अरुणा धरणाच्या कालव्याला भेगा पडल्या आहेत. या कालव्याची तिरवडे तर्फ खारेपाटण येथील संरक्षण भिंतही कोसळली आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे.
२. बांदा-दाणोली मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी ही दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
३. मालवण तालुक्यातील कुमामे, गोळवण येथील जयवंत जयराम घाडीगावकर यांची गणेशमूर्ती शाळा अतीवृष्टीमुळे कोसळली. यामध्ये घाडीगावकर यांची अडीच लाख रुपयांची हानी झाली आहे.
४. ओरोस, जिजामातानगर येथील शेकडो नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. येथील पूरग्रस्त भागाची खासदार नारायण राणे यांनी ८ जुलैला पहाणी करून संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या. येथील सर्व नागरिकांची डॉन बॉस्को हायस्कूल आणि ‘राजधानी हॉटेल’मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
५. देवगड तालुक्यात पियाळी नदीला पूर आल्याने आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.