गोव्यात अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी

  • राज्यात गेल्या २४ घंट्यांमध्ये ९.२६ इंच पावसाची नोंद

  • नेवरा येथे भिंत कोसळल्याने आई आणि मुलगा यांचा मृत्यू

पणजी, ८ जुलै (वार्ता.) – अतीवृष्टीमुळे राज्यात मोठी हानी झालेली आहे. २४ घंटे सातत्याने कोसळणार्‍या पावसाने ८ जुलै या दिवशी काही वेळ विसावा घेतला. दक्षिणेत केपे येथील कुशावती नदीने, तर उत्तरेत वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे शिरवई-केपे, धारगळ, पारोडा, रिवण, माजोर्डा, उतोर्डा, फोंडा, सत्तरी, सासष्टी, पेडणे आणि डिचोली येथे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. काही रस्ते, पूल आणि मंदिरे पाण्याखाली गेली असून घरांच्या भिंतीही पडल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत, तर अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. मिर्याभाट, मुंडूर येथे नेवरा पंचायतीच्या जवळ घराची भिंत कोसळल्याने मारिया रॉड्रिग्स (वय ७० वर्षे) आणि त्यांचा मुलगा आल्फ्रेड रॉड्रिग्स (वय ५१ वर्षे) यांचे निधन झाले. अग्नीशमन दलाने मातीच्या ढिगार्‍यातून त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहे.
राज्यात गेल्या २४ घंट्यांमध्ये ९.२६ इंच पावसाची नोंद झाली आहे, तर १ जूनपासून एकूण पावसाची नोंद ५७.६७ इंच झाली आहे. गेल्या २४ घंट्यांत राजधानी पणजी केंद्रात सर्वाधिक म्हणजे १४ इंच, जुने गोवे केंद्रात १३ इंच, म्हापसा केंद्रात ११.६ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश केंद्रांत गेल्या २४ घंट्यांत मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झालेली आहे. आतापर्यंत वाळपई केंद्रात सर्वाधिक ७१ इंच, त्यानंतर सांगे केंद्रात ६८.४ इंच आणि सांखळी येथे ६५.५ इंच पावसाची नोंद झाली आहे.

अतीवृष्टीसंबंधी अन्य महत्त्वपूर्ण घडामोडी

१. हवामान खात्याने ८ जुलै या दिवशी मुसळधार पाऊस (रेड ॲलर्ट), ९ जुलै या दिवशी मध्यम स्वरूपाचा पाऊस (ऑरेंज ॲलर्ट) आणि पुढील ३ दिवस म्हणजे १२ जुलैपर्यंत अल्प स्वरूपाचा पाऊस (येलो ॲलर्ट) पडणार असल्याची माहिती दिली आहे.

२. पेडणे तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता, वीजवाहिन्या किंवा घरे यांवर झाडे पडली आहेत. सासष्टी तालुक्यात सुरावली रेल्वे ‘सबवे’ (रस्त्यांच्या खालून जाणारा मार्ग) पूर्णत: पाण्याखाली गेला आहे. डिचोली बाजारात मध्यरात्री पाणी शिरले. व्यापार्‍यांनी दक्षता घेऊन सामान वेळीच अन्यत्र हालवल्याने मोठी हानी झाली नाही. फोंडा तालुक्यात कुर्टी-बेतोडा बगलमार्गावर ‘आमिगोस’ हॉटेलजवळ सुमारे ५० मीटर लांबीची भली मोठी काँक्रीटची संरक्षक भिंत कोसळली आहे. उसगाव-वाळपई मार्गावरील गावकरवाडा येथील मुख्य साकव खचल्याने उसगाव ते वाळपई मुख्य रस्ता बंद करून उडीवाडामार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. गावकरवाडा, उसगाव येथील साकव (छोटा पूल) खचला आहे. साकव खचण्यापूर्वी या मार्गावरून वाळपई-फोंडा मार्गावरील कदंब बसगाडी गेली होती; मात्र नंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. केपे येथे कुशावती नदी दुथडी भरून वहात असल्याने सलग दुसर्‍या दिवशीही पारोडा रस्ता पाण्याखाली आहे. यामुळे मडगाव-सांगे मार्गावरील वाहने चांदरमार्गे वळवण्यात आली आहेत.

३. रिवण येथे श्री गणपति मंदिरातील गर्भगृहात पुराचे पाणी भरले होते.

४. धारगळ, पेडणे येथे महामार्गावर ७ जुलै या दिवशी दरड कोसळली होती. मातीचा ढिगारा काढून महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

५. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘पूरसदृश ठिकाणी स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचा प्राण वाचवणार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी अशा लोकांची नावे सरकारला दिलेली आहेत.’’

६. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरळीतपणे चालू असल्याचे विमानतळाच्या प्रशासनाने कळवले आहे. विमानतळावरील काही भागातील पाणी कर्मचारीवर्ग काढत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमात पसरल्यानंतर विमानतळाच्या व्यवस्थापनाने विमानतळाचे काम सुरळीतपणे चालू असल्याची सूचना प्रसारित केली.

७. वाहतुकीसंबंधी काही समस्या असल्यास संबंधित अधिकार्‍यांना संपर्क करण्याचे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे. यासाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक ‘११२’ किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाला संपर्क करण्याचे आवाहन पोलीस खात्याने केले आहे.

पणजीत २-३ ठिकाणीच पाणी साचले ! – मुख्यमंत्र्यांचा दावा

पणजी येथे सखल भागांत २-३ ठिकाणीच पाणी साचल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. ‘स्मार्ट सिटी’चे काम करूनही पणजी येथे गतवर्षीप्रमाणे अनेक भाग पाण्याखाली गेल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘मी दोन्ही जिल्हाधिकार्‍यांकडून तेथील स्थितीचा आढावा घेतला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कार्यान्वित झालेले असून जलस्रोत खाते पूरसदृश ठिकाणी पाणी पंपाच्या माध्यमातून खेचून काढत आहे.’’ प्राप्त माहितीनुसार ‘स्मार्ट सिटी’ची कामे चालू असलेल्या पणजी शहरात १८ जून रस्ता, कुंडईकर नगर, रायबंदर आदी भागांत अनेक घरे आणि दुकाने यांमध्ये पाणी शिरले. पणजी शहरात पाणी साचल्याच्या घटनेविषयी स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, ‘‘पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने आता सर्वांचीच परीक्षा आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या कामामध्ये काय चुकले हे कामाचा आढावा घेतल्यानंतर समजेल.’’