साधकांना आधार आणि सेवेसाठी प्रोत्साहन देणार्या पुणे येथील सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक !
पुणे येथील साधकांना पू. मनीषा पाठक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत. ८.७.२०२४ या दिवशी आपण यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. (भाग ३)
मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/812119.html
१. सौ. राधा सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे.
१ अ. साधकांच्या निवासाचे नियोजन करायला शिकवून ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या वेळी तेथील निवासव्यवस्थेची सेवा करून घेणे : ‘अन्य जिल्ह्यांतून साधक पुणे येथे सेवेसाठी येतात, तेव्हा पू. मनीषाताईंनी आम्हाला ‘त्या साधकांची निवासव्यवस्था कशी करायची ?’ हे पुष्कळ आदर्श पद्धतीने शिकवले आहे, उदा. ‘निवासासाठी साधकांना लागू शकणारे साहित्य, त्यांचे जेवण, पथ्य, विश्रांतीचा वेळ इत्यादी.’ आम्हाला थोड्या साधकांची निवासव्यवस्था करण्याचा अनुभव असतांना ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या वेळी पू. मनीषाताईंनी आम्हाला ५५० हून अधिक मंदिर विश्वस्तांची निवासव्यवस्था करण्याची सेवा दिली आणि त्यांनी ती सेवा आमच्याकडून अगदी सहजतेने करून घेतली.
१ आ. साधकाला प्रेमाने आधार देणे : एका साधकाच्या बहिणीचे निधन झाले होते. तो साधक त्या दु:खातून बाहेर पडत नव्हता. काही मासांनी रक्षाबंधन होते. त्या दिवशी पू. मनीषाताईंनी त्या साधकाला संपर्क केला. ‘‘मी तुझी बहीण आहे’, असे समज’’, असे प्रेमाने सांगून त्या साधकाला आधार दिला. त्यामुळे तो साधक निराशेतून बाहेर आला. ‘एखाद्याला आपलेसे करून आधार कसा द्यावा ?’, हे आम्हाला पू. मनीषाताईंकडून शिकता आले.
१ इ. लहान लहान गोष्टींतून साधकांना आनंद देणे : एकदा मला पू. मनीषाताईंच्या समवेत एका सत्संगाला जायची संधी मिळाली. तेव्हा मी प्रथमच ‘मेट्रो’ रेल्वेने प्रवास केला. याचा मला आनंद देण्यासाठी पू. मनीषाताईंनी माझ्या समवेत असलेल्या साधिकेला भ्रमणभाषमध्ये आमची ‘मेट्रो’ स्थानकावरील छायाचित्रे काढायला सांगितली. पू. मनीषाताई अशा लहान लहान गोष्टीतूनही साधकांना आनंद देतात. त्या क्षणाची मला आठवण झाली, तरी माझी भावजागृती होते.’
२. सौ. मंजिरी चव्हाण, पुणे
२ अ. ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू न्यून करून आत्मविश्वास वाढवणे : ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूमुळे मी सत्संगात कधीही पुढाकार घेऊन बोलत नसे. पू. मनीषाताई मला म्हणाल्या, ‘‘सर्व आपलेच साधक आहेत. तुझे काही चुकले, तर ते सांगतील. अजून किती दिवस ‘मला जमत नाही’, असे सांगणार ? आता कृती कर आणि बोल.’’ त्यानंतर सत्संगात बोलण्याचा माझा आत्मविश्वास वाढला.
२ आ. ‘प्रत्येक सेवा उत्तमच झाली पाहिजे’, हे सूत्र मनावर बिंबणे : ‘पूर्वी मी ‘मला जमते, तेवढेच करूया’, असा संकुचित विचार करत असे. पू. मनीषाताईंनी मला व्यापक विचार करायला शिकवले. ‘प्रत्येक सेवा आणखी चांगली कशी करू शकतो ?’, ‘प्रत्येक सेवा उत्तम झाली पाहिजे. त्यासाठी कष्ट घ्यायला हवेत’, असा पू. मनीषाताईंचा विचार असतो. त्यामुळे माझाही सेवा करण्याविषयीचा दृष्टीकोन पालटला आहे.
२ इ. ‘बिंदूदाबन उपचार पद्धती’ शिबिराच्या आधी रुग्णाईत झाल्यावर दुसर्या साधकांना साधिकेसाठी नामजप करायला सांगणे : माझ्याकडे ‘बिंदूदाबन उपचार पद्धती’ शिबिराच्या आयोजनाची सेवा होती. शिबिराच्या ३ दिवस आधी मी रुग्णाईत झाले. पू. मनीषाताईंनी माझ्यासाठी नामजपादी उपाय घेतले आणि ‘माझ्याकडे शिबिराच्या आयोजनाची सेवा असल्याने मला नामजपाला वेळ मिळणार नाही’, हे लक्षात घेऊन अन्य एका साधकांना माझ्यासाठी नामजप करायला सांगितला. यातून मला त्यांच्यातील इतरांचा विचार आणि प्रीती अनुभवता आली.’
३. सौ. अनुराधा तागडे, (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६९ वर्षे), सातारा रस्ता, पुणे.
३ अ. साधकांना ‘ताण न घेता भावपूर्ण प्रचार करा’, असे सांगून प्रोत्साहन देणे : ‘आम्हाला आंबेगाव पठार येथे सत्संग चालू करण्यासाठी प्रचार करायचा होता. काही वेळा प्रचारासाठी केवळ २ – ३ साधकच यायचे. तेव्हा पू. मनीषाताईंनी आम्हाला पुष्कळ आधार दिला. त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘जितके साधक असतील, त्यांना घेऊन आपण भावपूर्ण प्रचार करूया. ताण घेऊ नका.’’ त्यामुळे सर्व साधकांनी सकारात्मक राहून संघभावाने प्रचार केला. प्रवचनाला ४६ जिज्ञासू उपस्थित राहिले अन् तिथे सत्संग चालू झाला. सत्संगालाही ३६ जिज्ञासू आले.’(समाप्त)
(सर्व सूत्रांचा दिनांक: २५.२.२०२४)