दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कॅनडाच्या पारपत्राचे आमीष दाखवून फसवणूक !; लोकलसमोर उडी मारून वडील-मुलाची आत्महत्या !…
कॅनडाच्या पारपत्राचे आमीष दाखवून फसवणूक !
मुंबई – कॅनडाचे पारपत्र मिळवून देण्याचे आमीष दाखवून ४० हून अधिक जणांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी रिना शहा आणि गौरव शहा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. त्या दोघांनी १ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक केली. (अशांकडून सर्व रक्कम वसूल करून घ्यायला हवी ! – संपादक)
लोकलसमोर उडी मारून वडील- मुलाची आत्महत्या !
भाईंदर (जिल्हा ठाणे) – ९ जुलैला सकाळी भाईंदर रेल्वेस्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणार्या लोकलसमोर उडी मारून वडील हरिश मेहता आणि मुलगा जय मेहता यांनी आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.
कल्याण ग्रामीणमधील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश
नवी मुंबई – नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. गाव विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी ही मागणी केली होती. १४ गावांच्या मालमत्ता हस्तातरणाच्या कामाला ११ जुलैपासून प्रारंभ होईल.
सलमानच्या घरावरील गोळीबारप्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट !
मुंबई – अभिनेते सलमान खान यांच्या वांद्रे येथील घरावरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सहा गुंडांविरोधात न्यायालयात १ सहस्र ७०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले. सागर पाल, विक्की गुप्ता, सोनू कुमार बिश्नोई, हरपाल सिंह उपाख्य हॅरी, महंमद रफिक चौधरी आणि अनुज थापन यांच्यावर मकोकानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बाळाची हत्या करून आईची आत्महत्या !
स्त्रियांमधील संयम नष्ट होत असल्याचे दर्शवणारे उदाहरण !
पालघर – येथे आईने स्वत:च्या साडेचार महिन्यांच्या मुलीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. पती बाहेर फिरायला नेत नाही, या कारणावरून हे पाऊल उचलल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.
निलंबित वरिष्ठ पोलीस अधिकारी खालिद यांची चौकशी चालू !
मुंबई – घाटकोपर येथे झालेल्या विज्ञापनाचा फलक पडल्याच्या दुर्घटनेनंतर निलंबित वरिष्ठ पोलीस अधिकारी कैसर खालिद यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला प्रारंभ केला आहे. खालिद यांच्याविरोधात अंधेरीस्थित एका व्यक्तीने महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात तक्रार केली होती.