संपादकीय : अशांत काश्मीर !
काश्मीरमध्ये गेल्या २ दिवसांत जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ सैनिकांना वीरमरण आले आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्या क्षणापासून जम्मू-काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. यातून त्यांनी मोदी सरकारला आव्हान दिले आहे. जवळपास १ मास उलटून गेल्यानंतर जिहादी आतंकवादी वरचढ ठरल्याचेच गेल्या २ दिवसांतील घटनांतून दिसून येत आहे. ‘काश्मीरमधील जिहादी आतंकवाद पूर्वीच्या तुलनेत अल्प झाला आहे’, असे भाजप सरकारकडून म्हटले जात आहे. काँग्रेस सरकारच्या काळाच्या तुलनेत हे जरी काही प्रमाणात खरे असले, तरी ते म्हणजे आदर्श नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे. या १० वर्षांत जिहादी आतंकवाद्यांची पाळेमुळे खणून काढायला हवी होती, तसे काही झालेले नसल्याने नवीन आतंकवादी येतात आणि भारतीय सैन्याला, हिंदूंना लक्ष्य करतात, हे चालूच आहे. काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट न होण्यामागे स्थानिक मुसलमान जनतेचा आतंकवाद्यांना असलेला छुपा पाठिंबा कारणीभूत आहे, तसेच आतंकवादी जनतेला धाक दाखवून त्यांना साहाय्य करण्यास भाग पाडतात, असेही दिसून येते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे कुणीही कितीही ओरडले, तरी ते खरे नाही. ‘आतंकवाद्यांना धर्म असतो आणि काश्मीरमध्ये याच धर्मप्रेमामुळे जिहादी आतंकवादी अद्यापही कार्यरत आहेत आणि ते हिंदु असणार्या भारतीय सैन्याला, सरकारला आणि भारत देशाला लक्ष्य करत आहेत’, हे वास्तव स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ते स्वीकारले, तर त्या स्तरावर जाऊन उपाययोजना काढता येऊ शकते; मात्र भारताने ते स्वीकारलेलेच नसल्याने हा आतंकवाद नष्ट करण्याचे प्रयत्न अयशस्वीच ठरत आहेत.
शासनकर्त्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव !
सध्या जिहादी आतंकवादी काश्मीर खोर्यातील गुहांमध्ये दडून बसतात आणि नंतर बाहेर येऊन कारवाया करतात, अशी माहिती मिळाल्यानंतर सरकारच्या आदेशानंतर आता भारतीय सैन्य या गुहांना नष्ट करण्याची मोहीम चालू करणार आहे. काश्मीरमधील या गुहा प्राचीन नैसर्गिक ठेवा आहेत; मात्र तो आतंकवाद या कारणामुळे नष्ट करावा लागत आहे, हे दुर्दैव आहे. मुळात हे सर्व वरवरचे उपाय आहेत. काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी सर्व पातळीवर युद्धस्तरावर प्रयत्न झाले पाहिजे होते. तसे झालेले दिसत नाहीत. अनेकदा सैन्य किंवा पोलीस सांगतात की, पाकव्याप्त काश्मीरमधून अमुक इतके आतंकवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या सिद्धतेत आहेत. त्यानंतर मग सैन्य आणि पोलीस आतंकवादी घुसू नयेत; म्हणून डोळ्यांत तेल घालून पहारा देतात; मात्र आतंकवादी नेहमीप्रमाणे काश्मीरमध्ये घुसतात आणि कारवाया करतात. सैन्य आणि पोलीस नंतर त्यांना शोधतात अन् ठार करतात. हे वर्षानुवर्षे चालू आहे. ‘जेव्हा आतंकवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्यासाठी ‘लाँच पॅड’वर जमा होतात, तेव्हाच त्यांच्यावर आक्रमण का केले जात नाही ?’, हा प्रश्न उपस्थित होतो. उरी येथील सैन्यतळावरील आक्रमणानंतर भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून हीच कृती केली होती. आतंकवाद्यांच्या ‘लाँच पॅड’वर जाऊन त्यांना ठार केले होते. पुलवामा येथील आक्रमणानंतर वायूदलाने आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणार्या पाकव्याप्त काश्मीरमधील बहावलपूरमधील ठिकाणावर आक्रमण करून आतंकवाद्यांना ठार केले होते. या दोन्ही घटना भारताने मार खाल्ल्यानंतर केल्या होत्या. ‘त्या मार खाण्यापूर्वीच का केल्या नाहीत आणि त्यानंतरही आजपर्यंत आपण पाकमध्ये घुसून कारवाया का करत नाही ?’, हा प्रश्न आहे. पाकिस्तान गेली ३ दशके आतंकवादी निर्माण करतो आणि काश्मीरमध्ये पाठवतो. म्हणजेच आतंकवादाची उत्पत्ती भारताला ठाऊक आहे, तर मग याच केंद्र स्थानावर भारताने आक्रमण का केले नाही ? भारताच्या जागी इस्रायल असते, तर एव्हाना पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व आतंकवादी तळे नष्ट होऊन तो भाग पुन्हा भारताला जोडला गेला असता; मात्र भारत असे अद्यापही करू शकलेला नाही, ही लज्जास्पद गोष्ट आहे. यामुळे सहस्रावधी भारतीय सैन्यांना हुतात्मा व्हावे लागत आहे आणि याच स्थितीमुळे पुढेही व्हावे लागणार आहे, असेच चित्र आहे. एखादे आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर संरक्षणमंत्री, गृहमंत्री आदी बैठका घेण्याचे सोपस्कार पार पाडतात आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात, असेच चालत आले आहे. ‘कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी सोडवायचीच नाही’, अशीच भारतीय शासनकर्त्यांची प्रत्येक गोष्टीत मानसिकता राहिलेली आहे. तीच दिसून येत असते. इस्रायलने हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी गाझा पट्टी बेचिराख केली आहे. पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्याच्या सैन्याकडे लढण्यासाठी दारूगोळा नव्हे, तर वाहनांमध्ये भरण्यासाठी इंधनच नाही. अशा पाकला चिरडण्यासाठी भारताला कितीसा वेळ लागणार आहे ? मात्र भारतीय शासनकर्त्यांकडे इच्छाशक्ती नाही, असेच दिसते. भारतीय शासनकर्ते आंतरराष्ट्रीय दबावाचा बागुलबुवा दाखवून स्वतःची इच्छाशक्ती नसलेल्या मानसिकतेला लपवत असतात, असेच लक्षात येते.
हिंदूंचा दबाव हवा !
काश्मीरमध्ये मूठभर आतंकवादी येतात आणि कारवाया करतात. त्यांच्यामुळे गेली ३ दशके काश्मीर अशांत आहे. साडेचार लाख हिंदू विस्थापित झाले आहेत. ते अजूनही त्यांच्या मूळ ठिकाणी परतू शकत नाहीत आणि पुढे कधी परतू शकतील, अशीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. हे भारतीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे. ही स्थिती पालटण्यासाठी कोणत्याही शासनकर्त्याने लक्ष्य ठेवून योजना आखली नाही किंवा त्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केलेले नाहीत, ही काश्मिरी हिंदूच नाही, तर सर्व राष्ट्रप्रेमी भारतियांची खंत आहे. काश्मीरमध्ये चालू असलेल्या आतंकवादी कारवाया लवकर थांबतील, असे वाटत नाही; कारण मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याने पाकने जाणीवपूर्वक आक्रमणे वाढवली आहेत. हे लक्षात घेऊन तरी मोदी सरकारने आतंकवाद्यांवर कठोर प्रहार करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करायला हवा होता, हे गेल्या महिन्याभरात तरी दिसून आलेले नाही. यातून सरकारची मानसिकता दिसते आणि पुढे काय होत रहाणार, हेही स्पष्ट होते. त्यामुळे काश्मीर अशांत आहे आणि पुढेही अशांतच रहाणार, हे स्पष्ट होते. तर मग ही स्थिती कशी पालटायची ? यावर काय करायला हवे ? असे प्रश्न उपस्थित होतात. त्याच्यासाठी भारतीय जनतेने, विशेषतः हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण करून काश्मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्ट करण्यास बाध्य केले पाहिजे. मार खाल्ल्यावर नाही, तर मार देणार्यांना नष्ट करण्यासाठी कृती करा, यासाठी जनतेने रस्त्यावर आले पाहिजे. दुर्दैवाने असे करण्यासाठी भारतीय म्हणजे हिंदू संघटित नाहीत आणि सिद्धही नाहीत. एखादे आतंकवादी आक्रमण झाल्यावर एखाद-दुसरी संघटना याविरोधात १ घंट्याचे आंदोलन करते आणि गप्प बसते. अशाने काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार ! |